Crime News : बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि इतरांवर गंभीर आरोप करणाऱ्या व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेदिगड्डा बॅराजचे काही खांब कोसळल्या प्रकरणी या व्यक्तीने के. सी. राव आणि इतरांवर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री जयशंकर-भूपालपल्ली जिल्ह्यातील भूपालपल्ली येथे दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या व्यक्तीने दाखल केलेल्या खटल्याला आव्हान देण्यासाठी केसीआर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती त्याच्या एक दिवस आधी या व्यक्तीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे.
संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मूर्ती दुचाकीवरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून चाकूने वार केले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार मारण्यात आले.
“जमिनीचा वाद हा हत्येचे कारण असू शकतो असे आम्हाला वाटते. मुर्ती याचे परिसरातील काही लोकांबरोबर जमिनीच्या वा होते”, असे डेप्युटी एसपी संपत राव यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. हत्या करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
मुर्ती यांनी भूपालपल्ली पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२३ मध्ये केसीआर, माजी पाटबंधारे मंत्री टी हरिश राव आणि इतरांविरोधात कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा भाग असलेल्या मेदिगड्डा बॅराजचे खांब वाहून गेल्याच्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज केला होता.
तसेच त्यांनी या प्रकल्पात जनतेचा कोट्यवधी रूपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. जेव्हा पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचले.
मूर्ती यांनी २०२३ विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांची पत्नी सरला या भूपालपल्ली नगरपालिकेच्या माजी नगरसेवक आहेत.