कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी (१ मार्च) बॉम्बस्फोट झाला होता. आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली होती. या स्फोटामुळे १० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी संशयिताचं छायाचित्र समोर आलं. आता या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयने मोठी कारवाई केली आहे.
NIA कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर आता एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. रामेश्वर कॅफेमध्ये ज्या संशयिताने स्फोट घडवला त्याला भेटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. १ मार्चच्या दिवशी स्फोट घडवल्यानंतर आठ तासांनी हा माणूस स्फोट घडवणाऱ्या संशयिताला भेटला होता. बल्लारी या ठिकाणी या दोघांची भेट झाली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ६ मार्च रोजी चार जणांना एनआयएने कोठडीत धाडलं. त्यानंतर ही कारवाई आता एनआयएने केली आहे. ज्या माणसाला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याचं नाव सय्यद शबीर आहे असंही स्पष्ट झालं आहे.
बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड परिसरात स्थित असलेला रामेश्वर कॅफे शहरात लोकप्रिय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने कॅफेमध्ये बॅग सोडली. नाश्ता केल्यानंतर तो बॅग तिथेच सोडून निघून गेला. त्यानंतर बॉम्बस्फोट झाला.
सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये काय दिसले?
संशयित आरोपीने मास्कने आपला चेहरा झाकलेला असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसत आहे. तसेच त्याने चष्मा घातलेला असून डोक्यावर टोपी आहे. कॅफेत आल्यानंतर त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली, आपली ऑर्डर घेऊन जातानाही तो दिसत आहे. शुक्रवार १ मार्चच्या दुपारी १२.५० ते १ वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाल्याचे कळते. या दुर्घटनेत १० लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी संशयिताला भेटलेल्या इसमाला ताब्यात घेण्यात आल्याने आणखी माहिती एनआयएच्या हाती लागण्याची शक्यता आहे.