कन्हैयाला गोळी घालून ठार मारणाऱ्यास ११ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा करणारा पूर्वांचल सेनेचा अध्यक्ष आदेश शर्मा याच्या बँक खात्यात अवघे १५० रूपये असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. याशिवाय, आदर्श शर्मा राहत असलेले घरदेखील भाड्याचे असून त्याने या घराचेही भाडेही थकवल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शर्मा हा मूळचा बिहारमधील बेगुसराय येथे राहणारा असून, पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. काही दिवसांपूर्वी ‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला गोळ्या घालून ठार मारणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशा आशयाचे पोस्टर्स पूर्वांचल सेनेतर्फे नवी दिल्लीतील बसस्टॉप आणि मेट्रो स्टेशनवर लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर संघटनेचा अध्यक्ष म्हणून आदर्श शर्माचे नाव होते. यानंतर कलम १०७ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या त्याचा फोन बंद असून तो नातेवाईक, मित्र कोणाच्याही संपर्कात नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आदर्श शर्मा याच्याकडे नियमित उत्पन्नाचा कुठलाही स्त्रोत नव्हता. तो बहुतेकदा मित्रांकडून पैसे उधार घेत असे. सरकारी कार्यालये किंवा पोलीस ठाण्यात तुमचे काम करून देतो, असे सांगून त्याने अनेकांकडून १०० ते ५०० रूपये घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader