Kerala Bank Heist : केरळमध्ये एका वर्दळीच्या रस्त्यावर बँकेत दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अवघ्या अडीच मिनिटांमध्ये हा व्यक्ती बँकेतील रक्कम लुटून फरार झाला होता. अखेर घटनेच्या तीन दिवसांनंतर रविवारी या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव रिजो अँटनी (४२) असे आहे. शुक्रवारी अँटनी हा त्रिस्सूर जिल्ह्यातील पोट्टा येथील फेडरल बँकेत घुसला आणि त्याने चाकूचा धाक दाखवून सर्व बँक कर्मचाऱ्यांना बाथरूममध्ये बंद केले. यानंतर तो बँकेतील १५ लाख रुपयांची रोकड लुटून स्कूटरवरून फरार झाला होता. दरम्यान त्रिस्सूरचे डीआयजी हरी शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजीटल पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अँटनीचा मागोवा घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नियमीतपणे बँकेच्या समोर असणाऱ्या चर्चेमध्ये जात असे. चर्चेमधून तो बँकेतील सुरक्षा कशी असते हे पाहू शकत होता. तेथूनच बँकेतील सुरक्षाव्यवस्था कशी आहे याबद्दल त्याने सविस्तर माहिती गोळा केली, इतकेच नाही तर बँकेत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहून त्याने बँकेच्या शाखेत सर्वात कमी ग्राहकांची गर्दी कोणत्या वेळेत असते हे शोधून काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी कसा सापडला?

“दरोडा टाकला त्या दिवशी तो बँकेत खोटी नंबर प्लेट लावलेल्या स्कूटरवरून आला. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोड्याच्या घटनेनंतर हेच स्कूटर परिसरात फिरताना दिसून येत होते. त्यानंतर आम्ही त्याच कंपनीचे स्कूटर वापरणाऱ्या लोकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. चर्चमधून आम्ही असे स्कूटर वापरणाऱ्यांची यादी मिळवली आणि त्या स्कूटर मालकांच्या हालचालिंवर लक्ष ठेवले. अशा प्रकारे आम्ही संशयीत आरोपीपर्यंत पोहचलो,” असे डीआयजी म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी केल्यानंतर आरोपी रोडवरून थेट त्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने दोरोड्याच्या वेळी घातलेले जॅकेट बदलले.

पत्नी परतण्याआधी कर्ज फेडायचे होते

डीआयजी शंकर यांनी सांगितले की, आरोपी हा बेरोजगार आहे आणि आखाती देशात नर्स म्हणून काम करणाच्या पत्नीने पाठवलेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करतो. “तो ऐषोआरामाचे जीवन जगत होता, त्याने पत्नीने पाठवलेले पैसे वाया घालवले. त्याने १० लाख रुपयांचे कर्जही करून ठेवले होते. त्याची पत्नी पुढच्या महिन्यात घरी येणार असल्याने, त्याला ते कर्ज फेडायचे होते आणि म्हणूनच त्याने दरोड्याची योजना आखली. अवघ्या दोन आठवड्यांत त्याने ही योजना आखली,” असेही डीआयजी म्हणाले.