२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी बंगळुरूमधून अटक केली आहे. शंकर मिश्रा असे या व्यक्तींचं नाव आहे. तसेच त्याला आज बंगळुरूमधून दिल्लीत आणण्यात येणार आहे.
हेही वाचा – महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरण : DGCA ने एअर इंडियाला फैलावर घेतलं; म्हणाले, “हा प्रकार…”
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी दिल्ली पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्यासाठी पथकंदेखील तयार करण्यात होती. या पथकांद्वारे आरोपीच्या मुंबईतील घरी छापा टाकण्यात आला. मात्र, घराला कुलूप होते. दरम्यान, शंकर मिश्रा बंगळुरूमध्ये त्याच्या नातेवाईकाकडे लपून बसला असल्याची माहिती दिली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज ( शनिवारी) बंगळुरूतील त्याच्या नातेवाईकाच्या घरातून आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी आपल्या मुलाची पाठराखण करत त्याला मुलाला ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप केला आहे. “त्या महिलेने काही पैशांची मागणी केली होती. तिने मागितलेली रक्कमही नंतर देण्यात आली होती. मात्र पुढे काय झाले, याबाबत मला कल्पना नाही. तिने माझ्या मुलाकडे आणखी काही मागणी केली असावी. मागणी पूर्ण न करू शकल्यामुळेच महिलेकडून माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जात असावा,” असा दावा श्याम मिश्रा यांनी केला आहे.