Employee Die in Thailand : कार्यालयीन कामाच्या अतिरिक्त तासामुळे तसंच कामाच्या तणावामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आता थायलंडमधीलही असाच एक प्रकार समोर आलाय. प्रकृती चांगली नसतानाही सुट्टी नाकारल्याने एका महिलेचा कार्यालयातच मृत्यू झालाय. बँकॉक पोस्टने यासंर्भातील वृत्त दिलं आहे.

थायलंडच्या समुत प्राकान प्रांतात इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये ही ३० वर्षीय महिला कार्यरत होती. तिच्या मोठ्या आतड्याला सूज आली होती. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून तिने कार्यालयातून ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान रजा घेतली होती. या कळात तिने रुग्णालयात दाखल होऊन उपचार करून घेतले. उपचारांनंतर तिला डिस्जार्जही मिळाला. परंतु, डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे बरं वाटत नसल्याने तिने आणखी दोन दिवसाची सुट्टी मागितली.

हेही वाचा >> Anna Sebastian: कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा या निमित्ताने चर्चेत!

१२ सप्टेंबरच्या संध्याकाळी तिने मॅनेजरकडे पुन्हा एकदा आजारी असल्याने सुट्टी मागितली. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. परंतु, तिने ऑफिसमध्ये येऊन वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना तिच्या मॅनेजरने केले. नोकरी जाईल या भीतीने ती १३ सप्टेंबर रोजी कार्यालयात हजर राहिली. ऑफिसमध्ये गेल्यानंतर २० मिनिटांतच ती खाली कोसळली, असा दावा तिच्या मित्राने केला आहे. ती खाली कोसळल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. परंतु, दुसऱ्या दिवशी नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिसमुळे तिचा मृत्यू झाला.

कामाच्या अतिताणामुळे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

दरम्यान, काही दिवासंपूर्वी पुण्यातील इवाय कंपनीतही असाच प्रकार घडला होता. कामाच्या अतिताणामुळे अ‍ॅना सेबेस्टियन या २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. नोकरील लागल्याच्या अवघ्या चौथ्या महिन्यातच तिचा मृत्यू झाल्याने तिच्या पालकांनी तिच्या मृत्यूला ऑफिसला जबाबदार धरलं आहे. एवढंच नव्हे तर तिच्या अंत्यविधीलाही तिच्या कार्यालयातून कोणी आलं नसल्याने आईने नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण उजेडात येताच बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण देऊ नये असं आवाहन केलं जात आहे.

नरकात तुमचं स्वागत आहे

बंगळुरूतील एका ३२ वर्षीय शेफनं नुकताच तिला कामाच्या ठिकाणी आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. “जेव्हा मला बंगळुरूतल्या एका आलिशान हॉटेलच्या किचन स्टाफमध्ये समाविष्ट करण्यात आलं, तेव्हा आमच्या प्रोग्रॅम डायरेक्टरनं माझं स्वागत एका वाक्यात केलं. तो म्हणाला, ‘नरकात तुमचं स्वागत आहे’. आमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही समस्या असली तरी कामावर हजर राहण्याची सक्ती होती. आमचं ब्रेकअप झालं असो किंवा कुटुंबात कुणाचं निधन झालं असो, तरी चेहऱ्यावर मेकअप करून आम्ही हसत ग्राहकांचं स्वागत करणं अपेक्षित असायचं”, असं या महिला शेफनं सांगितल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.