भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसुठ काँग्रेसचा उद्धार करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोनिया गांधींचे अनुकरण करा, असा सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा हे सोनिया गांधींकडून शिकले पाहिजे, असा सल्ला सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. मेनका यांनी शनिवारी पिलिभीत येथील जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत बोलताना हे वक्तव्य केले. यावेळी समितीतील अधिकाऱ्यांनी येथील शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबद्दल असमर्थता दर्शविली. त्यावेळी मेनका गांधी यांनी भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा, यासाठी सोनियांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, असा सल्ला समितीमधील अधिकाऱ्यांना दिला. मेनका यांनी सांगितल्याप्रमाणे सोनिया गांधी यांच्या एका नातेवाईकाने एक दुकान उघडले होते. सोनियांचे नातेवाईक असल्याचे सांगून तो आपल्या दुकानाची जाहिरात करत होता. तेव्हा सोनियांनी थेट वृत्तपत्रात जाहिराती देऊन लोकांना त्या दुकानात जाऊ नका, असे सांगितले. लखनऊमधील अनेक शाळांमध्ये परवानगी नसून मोठ्या इयत्तांचे वर्ग चालवले जातात. काही सरकारी बाबुंकडून पैसे घेऊन या शाळांना परवानगी दिली जाते. मात्र, या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे हक्क आम्हाला नाहीत, अशी व्यथा या बैठकीत समितीतील एका अधिकाऱ्याने मेनका यांच्यासमोर मांडली. त्यावेळी मेनका यांनी अधिकाऱ्यांना शाळेच्या परवानगीसाठी थेट आमच्याकडे या, अशी जाहिरात करण्यास सांगितले. तुमच्या कार्यालयात तशाप्रकारची नोटीसच लावा. यानंतर आम्ही त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करू, असे मेनका यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा