मनेका गांधी यांची राष्ट्रीय महिला आयोगाला सूचना

महिलांकडून पुरुषांचा छळ होत असल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही महिला पुरुषांविरोधात चुकीच्या तक्रारी दाखल करून त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करतात. अशा पुरुषांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी व्यवस्था करता येईल का? अशी विचारणा केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे.

मनेका गांधी यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांना गुरुवारी याबाबत पत्र पाठवले आहे. महिला आयोगाला तक्रार करण्यासाठी ऑनलाइन सुविधा असावी. करण्यात आलेल्या तक्रारीचे निवारण पंधरा दिवसांच्या आत करावे, अशी मागणी त्यांनी पत्रामध्ये केली आहे.

मला पुरुषांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी येतात. कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, बलात्कार यांसारख्या गुन्हय़ामध्ये त्यांना विनाकारण अडकवले जात असल्याची त्यांची तक्रार आहे. मागील काही महिन्यांमध्ये अशा तक्रारींचे प्रमाण वाढल्यामुळे माझी काळजी वाढली असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी स्वतंत्र खिडकी असते, त्याचप्रमाणे पुरुषांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र खिडकी उघडता येऊ शकेल. मात्र त्याच वेळी सत्य घटनेत महिलांवरील हिंसाचार हा झालेलाच नसल्याचा दावा पुरुषांकडून करण्यात येऊ शकतो, याची मला जाणीव आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महिलांकडून होत असलेल्या छळाची तक्रार करताना पुरुषाकडून दाखल करण्यात येणारी तक्रार ही आधार कार्ड आणि वैध मोबाइल क्रमाक यांच्या माध्यमातून व्हावी, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. राष्ट्रीय महिला आयोग दरवर्षी २३ हजार तक्रारी हाताळते.

Story img Loader