केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी गुरूवारी अनपेक्षितपणे पर्यावरण खात्याच्या कारभारावर हल्ला चढवला. प्रकाश जावडेकर नेतृत्त्व करत असलेल्या या खात्याला कोणत्या हव्यासापोटी प्राण्यांची हत्या करावीशी वाटते, असा सवाल मेनका गांधी यांनी उपस्थित केला. मेनका गांधी यांच्या विधानाला निश्चित संदर्भ नसला तरी त्या पर्यावरण खात्याच्या कारभारावर प्रचंड संतप्त असल्याचे दिसून आले. पर्यावरण खात्याने काही दिवसांपूर्वी प्रत्येक राज्याला पत्र लिहून हत्ती, जंगली डुक्कर आणि माकडांसारख्या प्राण्यांना मारण्यास परवानगी दिली होती. पर्यावरण खात्याच्या याच निर्णयावर प्राणीप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेनका गांधी नाराज असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच मेनका यांनी प्राणीसंग्रहालयांना विरोध दर्शविला होता. प्राणिसंग्रहालय हे मनोरंजनाचे ठिकाण न राहता त्यावर बंदी घातली गेली पाहिजे, असे मत मेनका यांनी व्यक्त केले होते.
यापूर्वी १४ मार्च रोजी केंद्र सरकारने सूचना जारी करून हिमाचल प्रदेशातील माकडांना उपद्रवी घोषित केले होते. या माकडांच्या उपद्व्यापांमुळे स्थानिक पर्यटनावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार आल्यानंतर पर्यावरण खात्याने हे पाऊल उचलले होते. याशिवाय, गेल्यावर्षीच्या जून महिन्यात प्रकाश जावडेकर यांनी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या नीलगाई आणि जंगली डुक्करांना विशिष्ट कालावधीसाठी उपद्रवी म्हणून घोषित केले होते. या कालावधीत या प्राण्यांना ठार मारण्याची मुभा पर्यावरण खात्याने दिली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा