निराशेच्या मनस्थितीत अनेकदा आत्महत्येसारखं टोकाचं आणि चुकीचं पाऊल उचलल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. बंगाली टीव्ही मालिकांमधील एक सर्वपरिचित नाव असलेला अभिनेता सुवो चक्रवर्ती यानं चक्क फेसबुक लाईव्ह करून या लाईव्हमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगल चंडी, मनसा अशा मालिकांमधून लोकांमध्ये परिचित झालेला अभिनेता सुवो चक्रवर्ती गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या फेसबुक लाईव्हमध्ये सुवो आपल्या अडचणी देखील सांगत होता. ही बाब त्याच्या मित्रांना वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या फेसबुक लाईव्हमध्ये अभिनेता सुवो चक्रवर्ती आपल्या अडचणी सांगत होता. “प्रत्येक घरात या अडचणी असतात. माझी आई म्हणेल माझा मुलगा वयाच्या ३१व्या वर्षी देखील बेरोजगार आहे. माझ्या वडिलांचं पुढच्या वर्षी निधन झालं. आम्ही आता त्यांच्या पेन्शनच्या पैशांवर गुजराण करत आहोत. जे निराश असतात, त्यांना जगावंसं वाटत नाही. मी हे फक्त दाखवण्यासाठी म्हणून करत नाहीये. मी हळूहळू झोपेच्या गोळ्या घेणार आहे”, असं सुवो व्हिडीओमध्ये सांगत होता. काही वेळाने सुवोनं फेसबुक लाइव्ह अचानक बंद केलं.
दिल्ली : गायब झालेला रॅप गायक MC Kode अखेर सापडला! इन्स्टावर केली होती सुसाईड पोस्ट!
मित्रांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण!
दरम्यान, सुवो चक्रवर्तीचा हा फेसबुक लाइव्ह व्हिडीओ त्याचे अनेक चाहते बघत होते. आपलं बोलणं सुरू असतानाच सुवो गोळ्या देखील खात होता. बोलणं झाल्यावर त्यानं अचानक फेसबुक लाईव्ह बंद केलं. हे पाहून चिंतेत पडलेल्या एका चाहत्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच सूत्र हलवून त्याच्या सध्याच्या लोकेशनचा ठावठिकाणा शोधून काढला. यासाठी पोलिसांनी फेसबुकची मदत घेऊन सुवो चक्रवर्तीच्या लाईव्ह लोकेशनची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच सुवोच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता सुवोची प्रकृती स्थिर आहे.