मंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीक हा कथीत मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकच्या विचारांपासून प्रभावित झाल्याची माहिती समोर आहे. त्याच्या मोबाईलमध्ये झाकीर नाईकांचे व्हिडिओ सापडले असून त्याने ते इतरांसोबत शेअर केल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. आरोपी हा झाकीर नाईकचे व्हिडिओ कट्टरपंथी बनवण्यासाठी मज मुनीर, यासीन, जबी आणि इतरांसोबत शेअर करायचा, अशीही माहिती आहे.
शरीक हा मज मुनीर, यासीन आणि जबी यांचा हँडलर होता. शिवमोग्गा पोलिस अधिकार्यांच्या तपासानुसार शरीक हा कट्टरपंथी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांबरोबर पीडीएफ, व्हिडिओ आणि ऑडिओ शेअर करत असे. झाकीर नाईकसह ISIS आणि प्रभावशाली मुस्लीम नेत्यांचे बहुतांश व्हिडिओ त्याने शेअर केले होते. शरीकने तीर्थहल्ली, शिवमोग्गा आणि भद्रावती येथील तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचे प्रयत्न करत असल्याचेही पुढे आले आहे. तसेच पोलीस अधिकार्यांनी शरिकचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याच्या मोबाईलमध्ये झाकीर नाईक आणि इतर व्हिडिओ, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम खाते पोलिसांच्या हाती लागले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांनी म्हैसूर येथील त्याच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांनी स्फोटके, एक मोबाईल फोन, दोन बनावट आधार कार्ड, एक पॅन, डेबिट कार्ड आणि एक न वापरलेले सिम कार्ड जप्त केले होते.