टूजी स्पेक्ट्रममध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणातील संयुक्त संसदीय समितीला (जेपीसी) दिलेल्या असहमती पत्रात बदल केल्याचा आरोप करीत भाजप सदस्यांनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जेपीसी अध्यक्ष पी. सी. चाको प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी काँग्रेसचे हस्तक म्हणून काम करीत असल्याची टीका भाजपचे राज्यसभेतील उपनेते रविशंकर प्रसाद यांनी केली.
जेपीसीच्या अहवालातून काँग्रेसने भ्रष्टाचाराचे निर्लज्जपणे समर्थन केले आहे, असेही ते म्हणाले. खासदारांच्या विशेषाधिकाराचे हनन चाको यांनी केले आहे, असा आरोप प्रसाद यांनी केला.
टूजी प्रकरणात जेपीसीचा अहवाल मंगळवारी राज्यसभेत सादर करण्यात आला. अहवालात विरोधी पक्षाच्या असहमती पत्राचा समावेश करण्यात आला आहे. या पत्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग गाळून, संपादित करून अहवाल सादर करण्यात आल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली व रविशंकर प्रसाद यांनी सभापती हमीद अन्सारी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर भाजप सदस्यांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास प्रारंभ केला. वाढत्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. केवळ १२ दिवस चालणाऱ्या अधिवेशनातील मंगळवारी सलग चौथा दिवस गोंधळामुळे वाया गेला.
पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले की, असहमती पत्रातील परिच्छेद गाळण्यात आले. भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा हा प्रयत्न म्हणजे काँग्रेसच्या निर्लज्जपणाचा कळस आहे. चारही राज्यांत भ्रष्टाचारी व अकार्यक्षम काँग्रेसला नाकारल्यानंतर काँग्रेसचे हे वर्तन म्हणजे ‘सुंभ जळला तरी पीळ कायम’ असेच आहे. पावणेदोन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झालेला असताना काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी हा अहवाल सादर केला. त्यावर भाजप सदस्यांना सभागृहात बोलू दिले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा