दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर संघटनेत फेरबदल करावा, अशी आग्रही मागणी करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते खुलेपणे सरसावले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करून काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यावर कळसच चढविला आहे. मात्र आपल्या वक्तव्याने वादंग होताच त्यांनी त्यापासून घूमजाव केले आहे.
डॉ़ मनमोहन सिंग यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद देणे ही मोठी चूक होती़ त्यांना पंतप्रधान करण्यात काय शहाणपण होते, असा सवाल आपण यापूर्वीही केल्याचा दावा अय्यर यांनी केला. मात्र त्यावेळी कोणत्याही नेत्याने आपल्या मताला सहमती दर्शविली नाही. त्यामुळे आता पक्षात संघटनात्मक बदल करावे, अशी मागणी त्यांनी केली असून काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून भूमिका वठवावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि त्यांचे सरकार यांच्यात ऐक्याचा अभाव असल्याच्या वृत्ताचे अय्यर यांनी खंडन केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि डॉ. सिंग यांच्यात सातत्याने चर्चा होत असते. एखाद्या प्रश्नावर दोघे नेते चर्चा करूनच मार्ग काढतात, असेही ते म्हणाले. तथापि, उच्चपदस्थ नेतृत्वात बदल करण्याची गरज नाही, असे अय्यर म्हणाले.
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला हे एका अर्थाने उत्तम झाले कारण त्यामुळे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना अभिप्रेत असलेले संघटनात्मक बदल २१व्या शतकाच्या गरजेनुसार करता येणे शक्य होईल, असे वक्तव्य अय्यर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
तथापि, डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदावरून दूर करावे, अशी मागणी आपण केल्याचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमातून प्रकाशित झाले त्याचा अय्यर यांनी स्पष्ट इन्कार केला आहे. पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून अय्यर यांनी, आपण असे वक्तव्य केल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
निवडणुकीत पराभव झाला ते एका अर्थाने योग्य झाले, कारण त्यामुळे पक्षाला २१व्या शतकाच्या गरजेनुसार संघटनात्मक बदल करता येतील आणि त्याची मुहूर्तमेढ राजीव गांधी यांनी सुचविलेल्या ‘पंचायत राज’पासून करता येईल, असेही अय्यर म्हणाले.
सरकारमध्ये आल्यावर प्रत्येक वेळी आपण पक्षातील फेरबदलांबाबत चर्चा करतो. मात्र, आपले काहीच चुकलेले नाही, जी यंत्रणा कार्यरत आहे ती योग्यच आहे, असे सांगून प्रत्येक वेळी विजयी उमेदवार त्यामध्ये खोडा घालतात. दरम्यान, अय्यर यांचे ते वैयक्तिक मत आहे, पक्षाची तशी भूमिका नाही, असे स्पष्ट करून काँग्रेसने हात झटकले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा