Who Is Manikarnika Dutta: एका दशकाहून अधिक काळ ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका भारतीय इतिहासकाराला भारतात संशोधन करताना परदेशात राहण्याची परवानगी असलेल्या दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्याचा ठपका ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने ठेवला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिस्टल विद्यापीठासह ब्रिटनमधील प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केलेल्या ३७ वर्षीय डॉ. मणिकर्णिका दत्ता यांना शैक्षणिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ब्रिटेनबाहेर घालवलेल्या वेळेमुळे अनिश्चित काळासाठीची रजा नाकारण्यात आली आहे. त्यांचे काम त्यांच्या क्षेत्राशी अविभाज्य भाग असूनही, गृह मंत्रालयाने त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, ३७ वर्षीय डॉ. मणिकर्णिका दत्त त्यांच्या संशोधन कार्यासाठी ऐतिहासिक नोंदी मिळविण्यासाठी भारतात आल्या होत्या. परंतु ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार, १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळाच्या दीर्घ वास्तव्याच्या आधारावर ब्रिटनमध्ये राहण्यासाठी अर्ज करणारे लोक अनिश्चित काळासाठी राहण्यासाठी रजेसाठी अर्ज करण्यापूर्वी या १० वर्षांत जास्तीत जास्त ५४८ दिवस परदेशात राहू शकतात. पण, डॉ. दत्त ६९१ दिवस भारतात होत्या. यामुळे आता त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आता ब्रिटनने डॉ. दत्त ब्रिटनबाहेर राहिलेल्या दिवसांच्या आधारे त्यांचा ब्रिटनमध्ये राहण्याचा फक्त अधिकारच नाकारला नाही तर त्यांना देश सोडण्यासही सांगितले आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने, असा युक्तिवाद केला आहे की त्यांचे ब्रिटनमध्ये कौटुंबिक जीवन नाही. पण, द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार दत्त यांचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्या दक्षिण लंडनमध्ये पतीबरोबर एकत्र राहतात.

डॉ. मणिकर्णिका दत्त कोण आहेत?

डॉ. मणिकर्णिका दत्त युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन येथे इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी यापूर्वी ऑक्सफर्ड आणि ब्रिस्टल विद्यापीठांमध्ये संशोधन केले आहे. त्या त्यांचे पती डॉ. सौविक नाहा यांच्याबरोबर दक्षिण लंडनच्या वेलिंगमध्ये राहतात. .

डॉ. दत्त पहिल्यांदा सप्टेंबर २०१२ मध्ये विद्यार्थी व्हिसावर यूकेला गेल्या आणि नंतर त्यांना स्पाउस व्हिसा मिळाला. तर, दत्त यांच्या पतीला “ग्लोबल टॅलेंट” व्हिसा मिळाला आहे.

…तेव्हा मला धक्का बसला

“मला ब्रिटन सोडावे लागेल असे सांगणारा ईमेल आला तेव्हा मला धक्का बसला. मी ब्रिटनमधील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये काम केले असून १२ वर्षांपासून येथे राहत आहे. मी ऑक्सफर्ड विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी आल्यापासून माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग ब्रिटेनमध्ये घालवला आहे. माझ्यासोबत असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते,” असे डॉ. मणिकर्णिका दत्ता ऑब्झर्व्हरशी बोलताना म्हणाल्या.

Story img Loader