काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व प्रभारी मोहन प्रकाश यांनी आर्थिक हितसंबंधातून चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रकाश देवताळे यांची नियुक्ती केल्याचा आरोप माजी आमदार बाबुराव वाघमारे यांनी केला आहे. या नियुक्तीविरोधात वाघमारे यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे दाद मागितली आहे. ‘ज्याच्या रक्तात काँग्रेस असेल त्यालाच पद देणार’, या राहुल गांधी यांच्या घोषणेची आठवण करून देत वाघमारे यांनी ठाकरे व मोहन प्रकाश यांच्यावर शरसंधान केले.
वाघमारे यांनी सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले विजय वडेट्टीवार यांनी सोबत प्रकाश देवताळे यांना आणले. देवताळे यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी नेमून ठाकरे व मोहन प्रकाश यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. या नियुक्तीमागे वडेट्टीवार, मोहन प्रकाश व माणिकराव ठाकरे यांचे परस्परांशी असलेले आर्थिक हितसंबंध आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना वडेट्टीवार मंत्री होते. त्याच काळात त्यांची आर्थिक क्षमता वाढली. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नरेश पुगलिया यांचा पराभव करण्यासाठी वडेट्टीवार यांनी विरोधकांना रसद पुरवली. धनशक्तीच्या जोरावर पदे हस्तगत करणाऱ्या वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांमुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसेल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. प्रकाश देवताळे यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. शिवसेनेतही ते चांगलेच सक्रिय होते. कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांला डावलून देवताळे यांना जिल्हाध्यक्षपद देऊन मोहन प्रकाश व माणिकराव ठाकरे यांनी पदाचा दुरुपयोग केला असून देवताळे यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. देवताळे यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या या पत्रावर महापौर संगीता अमृतकर, बल्लारपूरच्या नगराध्यश्रा रजनी मुलचंदान यांच्यासह २६ काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
यासंबंधी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जे पक्षशिस्तीचे उल्लंघन करून थेट प्रसारमाध्यमांशी संपर्क साधतात त्यांच्यावर कारवाईची सूचना स्थानिक नेत्यांना केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा