Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकाबाबत मागील काही महिन्यांपासून मोठी चर्चा सुरु होती. यानंतर हे विधेयक नुकतच संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळाल्या. तसेच वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मंजूरी दिली. त्यामुळे आता वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. मात्र, आता वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन दिल्याने भाजपाच्या एका नेत्याचं घर पेटवण्यात आल्याची घटना घडली आहे.
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील मणिपूर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अस्कर अली मक्कामय्युम यांच्या निवासस्थानाची तोडफोड करत घराला आग लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्कर अली यांनी नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला समर्थन दिलं होतं. पण अस्कर अली यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच संताप व्यक्त करत जमावाने थेट घरालाच आग लावली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने अस्कर अली मकाकमयुम यांच्या घराची तोडफोड करत आग लावल्याची घटना घडल्यानंतर अस्कर अली यांनी माफी मागितली आहे. तसेच या संदर्भात अस्कर अली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारला वक्फ सुधारणा विधेयक मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीनंतर आता कायदा झालेल्या वक्फ विधेयकावरून राजकारण करू नका, असं आवाहनही अस्कर अली एका फेसबुक पोस्टमध्ये केलं आहे.
तसेच अस्कर अली यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना ही पोस्ट टॅग केली आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या मते रविवारी संध्याकाळी थौबल जिल्ह्यातील लिलोंग हाओरेबी संब्रुखोंग येथील अस्कर अली यांच्या घराजवळ एक जमाव अचानक आला. यानंतर या जमावाने आधी तोडफोड केली आणि नंतर घराला आग लावली. यानंतर मणिपूर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली, तसेच पोलिसांनी निदर्शकांना रोखलं.
दरम्यान, अस्कर अली यांनी वक्फ विधेयकाचे समर्थन केलं होतं आणि त्यांनी वक्फ विधेयकाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांविरुद्ध त्यांनी टीका केली होती. त्यामुळे अस्कर अली यांच्याविरोधात जमाव आक्रमक झाल्याचा दावा एका निदर्शने केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.