मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. आज (सोमवारी १० जून ) सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. हा ताफा इंफाळहून जिरीबाम जिल्ह्यात जात असताना राष्ट्रीय महामार्ग-३७ वर हा हल्ला करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; अतिरेक्यांकडून पोलीस चौक्या लक्ष्य; किमान ७० घरांना आग

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ६ जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका समाजातील ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. तेव्हापासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. यादरम्यान मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली होती. या घटनेनंतर १०० पेक्षा जास्त नागरिकांचे शिबिरांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षभरापासून हिंचाराच्या घटना घडत असताना जिरीबाममध्ये बऱ्यापैकी शांतता बघायला मिळाली होती. मात्र, ६ जूननंतर या भागातही हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्या.

हेही वाचा – मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी पोलीस चौकीसह अनेक घरे जाळली

दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भागातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आज जिरीबाम दाखल होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग-३७ वर असताना त्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur cm n biren singh convoy attacked by armed militants in kangpokpi district one security person injured spb