Manipur CM N Biren Singh resigns : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा आपला राजीनामा दिला. आजच सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार १२ आमदारही नेतृत्व बदलासाठी दबाव टाकत होते.

अखेर राज्यात नेतृत्व क्षमतेच्या मुद्द्यावर भाजपामध्ये वाढता अंतर्गत रोष शांत करण्यासाठी एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपद सोडले आहे. यानंतर काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला तेव्हा मणिपूर भाजपाचे अध्यक्ष ए. शारदा, भाजपा खासदार संबित पात्रा आणि किमान १९ आमदार देखील उपस्थित होते.

राज्यपालांना सुपूर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यात एन. बिरेन सिंह म्हणाले आहे की, मी मणिपूरी व्यक्तीच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाबद्दल आभारी आहे. सरकारने वेगवेगळ्या विकास कामांना गती दिली आणि विविध योजना लागू केल्या. एन. बिरेन सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण मदत आणि मार्गदर्शनामुळे मणिपूरच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली.

राजीनामा का दिला?

कॉनराड संगम (Conrad Sangma) यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (NPP) ने पाठिंबा काढून घेतला असला तरीदेखील आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी केली होती. जर फ्लोर टेस्ट झाली असती तर असमाधानी आमदार पक्षाचा व्हिप मान्य न करण्याची शक्यता होती, त्यामुळे सरकार संकटात येऊ शकले असते. या पासून बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. एन. बिरेन सिंह यांनी पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाबरोबर चर्चा केल्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एन. बिरेन सिंह हे मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर देखील विरोधकांच्या निशाण्यावर होते. विरोधकांकडून बऱ्याचदा त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

अमित शाह, जेपी नड्डांच्या भेटीनंतर निर्णय

एन बिरेन सिंह यांनी आज सकाळी दिल्लीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्याच्या राजकीय स्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भाजपाच्या सुत्रांनुसार तब्बल १२ आमदार नेतृत्व बदलाच्या मागणीसाठी दबाव टाकत होते. तर ६ आमदार तटस्थ होते.

Story img Loader