मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. विविध राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या घरावर जमावाकडून हल्ला केला जात आहे. शुक्रवारी रात्री आणखी एका नेत्याच्या घराला लक्ष्य करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी रात्री इंफाळमध्ये संतप्त जमावाने भाजपा नेते व ‘पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग अँड कन्जुमर अफेअर्स’ राज्यमंत्री एल सुसिंद्रो मेईतेई यांच्या खासगी गोदामाला आग लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठकी पार पडण्याच्या आदल्या रात्री भाजपा मंत्र्याच्या खासगी गोदामावर हल्ला केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्व इंफाळमधील खुराई येथे घडली. संतप्त जमावाने सुसिंद्रो मेईतेई यांच्या खासगी गोदामाला आग लावली. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केला, याबाबतचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलं आहे.

हेही वाचा- पंतप्रधान मन की बात ऐवजी ‘मणिपूर की बात’ कधी करणार? मणिपूर भारताचाच भाग आहे ना? विरोधकांचे सरकारला प्रश्न

गेल्या महिनाभरात, इम्फाळ परिसरात अनेक नेत्यांच्या निवासस्थानांवर संतप्त जमावाने हल्ले केले आहेत. यामध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह, राज्याचे कॅबिनेट मंत्री नेमचा किपगेन, मणिपूरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंदास कोंथौजम, उरीपोकचे आमदार रघुमणी सिंह, सुग्नूचे आमदार के रणजीत सिंह आणि नौरिया पखंगलकपाचे आमदार एस केबी देवी आदि नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’चा नारा, “मोदी खूनी आहेत” म्हणत नागरिकांकडून निषेध

मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. देशातील एका भागात हिंसाचार उफाळला असताना पंतप्रधान मोदी विदेशी वाऱ्या करत आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur violence angry mob torch bjp state minister susindro meiteis godown in imphal rmm