२०२३ हे वर्षं देशातील इतर अनेक घडामोडींसाठी चर्चेत राहिलं असलं, तरी मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार ही या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील घडामोडींपैकी एक होती. गेल्या ६ महिन्यांपासून अधिक काळापासून मणिपूरमध्ये मैतेई व कुकी समुदायामध्ये आपापसांत पराकोटीचे वाद व प्रसंगी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अजूनही त्या घटना थांबत नसून तेथील परिस्थितीवर तोडगा काढण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. शनिवारी मध्यरात्री मणिपूरच्या इम्फाळमध्ये झालेल्या गोळीबारात एका स्वयंसेवक गार्डचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत भावना भडकवणाऱ्या वार्तांकनासाठी पोलिसांनी एका स्थानिक वर्तमानपत्राचं संपादकपद सांभाळणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच मणिपूरच्या तेंगनोपाल जिल्ह्यात १३ पुरुषांचे गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आढळून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये घडलेली हिंसाचाराची घटना अद्याप मणिपूर शांत होऊ शकलेलं नाही, याचंच द्योतक असल्याचं बोललं जात आहे. या काळात आत्तापर्यंत मणिपूरमधील हिंसाचारात २०० हून अधिक लोक मारले गेले असून हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत.
गाझामध्ये मृत्यूचे तांडव, २४ तासांत १६५ पॅलेस्टिनी ठार; इस्रायलला शस्त्रविक्रीस बायडेन यांची मंजुरी
नेमकं काय घडलं?
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक समुदायातून काही तरुण स्वेच्छेनं गस्तीसाठी उभे राहात आहेत. ३५ वर्षीय जमेसबोंद निंगोम्बम हेही अशाच प्रकारे गस्तीसाठी उभे असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर व सुरक्षा रक्षक यांच्यात पहाटेपर्यंत चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये जमेसबोंद यांचा अविरत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला.
संपादक वांगखेमचा श्यामजाई यांना अटक
दरम्यान, मणिपूरमधील तणावपूर्ण वातावरणामध्ये भावना भडकवणारं वार्तांकन करत असल्याचा आरोप करत मणिपूर पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्राचे संपादक वांगखेमचा श्यामजाई यांना अटक केली आहे. पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेऊन ही कारवाई केल्यानंतर ऑल मणिपूर जर्नलिस्ट युनियन व एडिटर्स गिल्ड मणिपूर यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. वांगखेमचा यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.