पीटीआय, इम्फाळ
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी संघर्ष झाल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण झाली. या संघर्षामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून २५ जण जखमी झाले. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव लालगौथासिंह सिंगसिट असे असल्याची माहिती देण्यात आली. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या राज्यभरात मुक्त हालचाली निर्देशांना विरोध करण्यासाठी कुकी गटाने निदर्शने केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या. मैतेईंच्या ‘फेडरेशन ऑफ सिव्हिल सोसायटी’ने (एफओसीएस) या संघटनेने काढलेल्या शांतता मोर्चाला विरोध करणे हाही कुकींच्या निदर्शनांचा हेतू होता. निदर्शकांनी खासगी वाहने पेटवून दिली आणि इम्फाळहून सेनापती जिल्ह्याकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर परिस्थिती चिघळली. निदर्शकांनी एनएच-२ हा (इम्फाळ-दिमापूर) राष्ट्रीय महामार्गही बंद करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी वाहनांच्या वाहतुकीत अडथळे आणण्यासाठी रस्त्यावर टायर जाळले.
मैतेईंच्या शांतता मोर्चामध्ये १०पेक्षा जास्त वाहनांचा समावेश होता. तो कांगपोकपी जिल्ह्यात पोहोचण्यापूर्वीच सुरक्षा दलांनी सेकामी येथे अडवला. मोर्चा काढण्यासाठी परवानगी नसल्यामुळे तो थांबवण्याचे निर्देश होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, आपण केवळ मुक्त हालचाल निर्देशांचे पालन करत होतो असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते.