दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. अशातच मणिपूरमध्ये जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ बुधवारी ( 19 जुलै ) समाजमाध्यमांत व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
जमावाकडून महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराबाबत मौन बाळगलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर पहिल्यांदाच भाष्य केलं. अत्याचार करणाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असा इशारा मोदींनी दिला.
हेही वाचा : मणिपूर घटनेसंबंधी स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही!; महिला आयोगाकडून खंत
“मणिपूरची घटना कोणत्याही सुसंस्कृत राष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. माझे ह्रदय वेदना आणि संतापाने भरून गेलं आहे. एकाही दोषीला सोडणार नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाची संतप्त प्रतिक्रिया
मणिपूर हिंसाचाराची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. “दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकाराने ठोस कारवाई करावी. अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करेल,” असं सर्वोच्च न्यायालयाने बजावलं होतं.
हेही वाचा : “मणिपूर पेटलंय, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि पंतप्रधान मोदी ७७ दिवस…”, प्रियंका गांधी आक्रमक
दरम्यान, गेल्या २४ तासांत मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलिसांकडून ठिक-ठिकाणी झापेमारी सुरु आहे. राज्यातीत जिल्ह्यांमध्ये १२६ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तर, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१३ जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.