Manipur Women’s Violence Update : गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर राज्य धुमसतं आहे. येथे दोन समाजात सुरू असलेल्या वादामुळे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्षात या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतरही मणिपूर शांत करण्यास केंद्र सरकारला यश मिळालेले नाही. दरम्यान, मे महिन्यात घडलेल्या एका विकृत घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून व्हायरल होतोय. या व्हिडीओतील दृश्यानुसार, दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे. एवढंच नव्हेतर रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. यावरून आता देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे.
हेही वाचा >> मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“माननीय पंतप्रधानांनी मणिपूरवर आपले मौन सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएस, फ्रान्स, युएई देशात फिरत होते, भारतातील इतर राज्यात विविध कार्यक्रम आणि उद्घाटनासाठी जात होते, तेव्हा त्यांनी मणिपूरच्या लोकांचा विचार केला नाही. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की त्यांना आता मणिपूरची आठवण का आली असेल?” असा प्रश्न पी.चिदंबरम यांनी विचारला आहे.
“मणिपूरमधील महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे? सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांची दखल घेतल्याने मोदींना मणिपूरची आठवण झाली का?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्वांत आधी बिरेन सिंग यांचं बदनाम सरकार बरखास्त केलं पाहिजे. तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिज”, अशी मागणीही चिदंबरम यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. तसेच मणिपूरच्या मुलींबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.
हेही वाचा >> “मणिपूरप्रकरणी कारवाईसाठी आम्ही थोडावेळ देऊ, अन्यथा…”, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले
नरेंद्र मोदी म्हणाले, “माझं मन दुःख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे त्याच्या जागेवर आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावलं आहे. १४० कोटी देशवासीयांना खाली पहावं लागत आहे.”
“मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.