मागील तीन महिन्यांपासून ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. मणिपूरमधून दररोज महिलांवरील अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. अलीकडेच दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढल्याचा आणि त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजं असताना महिलांवरील अत्याचाराचं मणिपूरमधील आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, ३ मे २०२३ रोजी मणिपूरमध्ये जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर चुरचंदपूर येथील एक महिला आपल्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी कुकी समुदायाच्या एका गटाने तिला आडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली. “आम्ही जमावापासून वाचण्यासाठी शक्य तितक्या वेगाने धावलो,” असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं.

हेही वाचा- Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप

पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुकी समुदायाच्या एका गटाने अनेक घरांना आग लावली. यामध्ये पीडितेच्या घराचाही समावेश होता. ही जाळपोळीची घटना घडत असताना पीडितेनं आपली भाची, दोन मुलं आणि वहिनींसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. अर्धा किलोमीटर अंतर धावल्यानंतर ती अडखळली आणि खाली पडली. तोपर्यंत पीडितेची वहिनी मुलांसह सुरक्षित ठिकाणी धावत गेली. पण पीडितेला पाच ते सहा हल्लेखोरांनी आडवलं. तिने हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण नराधमांनी तिला मारहाण करत तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा- हैदराबादमध्ये तरुणीचे कपडे फाडून भररस्त्यात केलं नग्न; प्लास्टिकच्या कागदाने झाकावं लागलं अंग, नराधमला अटक

“अंत:करणातून ओरडूनही मला कुणाचीही मदत मिळाली नाही. त्यानंतर आणखी काही कुकी समुदायाचे हल्लेखोर अत्याचारात सामील झाले. या प्रकारानंतर माझी शुद्ध हरपली. मी जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा मी मैतेई समुदायाच्या लोकांनी वेढलेल्या घरात होते,” असंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चुरचंदपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur violence woman gang raped by kuki mob fir lodged rmm