गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. अशातच मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला. खरंतर ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. परंतु, घटनेनंतर दोन महिन्यात मणिपूर पोलिसांनी या घटनेप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली आणि कारवाईला सुरुवात झाली. या व्हिडीओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीदेखील खडे बोल सुनावल्यानंतर याप्रकरणी कारवाईला सुरुवात झाली. परंतु, अजूनही याप्रकरणी तपासाची गती धिमीच होती. अखेर आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. गृहमंत्रालयाने यासंबंधी निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. यासोबतच केंद्र सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करणार आहे. यामध्ये गृह मंत्रालय व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करण्याची विनंती करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, सरकारी सूत्रांनी माहिती दिली आहे की, मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढली जात असताना या घटनेचं चित्रण करण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. तसेच हा व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरे हे आता तमाशातले…”, गोपीचंद पडळकरांची खालच्या पातळीवर टीका
मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ४ मे २०२३ ला घडला. परंतु जुलै महिना अर्धा उलटला तरी याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही मोठी कारवाई केली नव्हती. या घटनेचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. एवढंच नाही तर संसदेतही त्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. गेल्या आठवड्याभरात या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.