मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची घटना बुधवरी उघडकीस आली. एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या व्हायरल व्हिडीओ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. तसंच मणिपूर पोलिसांनीही एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून माहिती मिळवत धाडसत्र सुरु ठेवलं. आत्तापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसंच धाडी सुरुच असणार आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
एन बीरेन सिंह यांनी काय म्हटलं आहे?
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी यानंतर म्हटलं आहे की या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल. फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी मी करेन. मी लोकांना आवाहन करतो आहे की त्यांनी सुरक्षा दलांना अडवू नये. जी घटना समोर आली आहे त्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असं म्हणत बीरेन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा- Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?
नेमकं काय आहे हे प्रकरण?
मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नव्हती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं, त्यानंतर आज सकाळी या प्रकरणातल्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. ANI ने हे वृत्त दिले आहे.
हे पण वाचा- Manipur Violence: “सुप्रीम कोर्टाने दखल घेतली म्हणून मोदींचं तोंड उघडलं”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा हल्लाबोल!
पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” आता पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे.