मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना बुधवारी उघड झाली. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ मात्र बुधवारी वाऱ्यासारखा व्हायरल झाला. त्यानंतर देशभरात संताची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या सगळ्या धक्कादायक प्रसंगात वाचलेल्या आणि कारगील युद्धासाठी लढलेल्या जवानाने आपबिती सांगितली आहे. मी कारगील युद्धाच्या वेळी देशासाठी लढलो पण निवृत्त झाल्यावर पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही असं आता या निवृत्त जवानाने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवृत्त जवानाने नेमकं काय सांगितलं?

“महिलांना विवस्त्र करुन ज्या प्रकारे जमावाने हिंसाचाराचं तांडव केलं ते मी कधीही विसरु शकत नाही. जंगलाल्या हिंस्र पशूंनाही लाजवेल असं ते वर्तन होतं. मी लढाई पाहिली आहे. कारगील युद्धात लढण्यासाठी मी आघाडीवर होतो. मात्र आता मला त्या युद्धापेक्षाही हे युद्ध भयंकर वाटतं आहे.”

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचाही आरोप आहे. अशात एफआयआरमध्ये आणखी एका महिलेचा उल्लेख आहे. या महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडलं गेलं. मात्र ती या व्हिडीओत दिसत नाही. भारतीय लष्करात सुभेदार या पदावर लढाई केलेले आणि आता सेवेतून निवृत्त झालेले या महिलेचे पती आहेत. चुराचांदपूरच्या एका बचाव कँपमध्ये त्यांनी आश्रय घेतला आहे. मणिपूरच्या हिंसाचारात आणि या घटनेत मी माझं घर, माझी कमाई, अब्रू आणि अभिमान सगळं काही गमावलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

हे पण वाचा- “पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर…”; मणिपूरप्रकरणी हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

या घटनेनंतर पत्नीला आलं डिप्रेशन

४२ वर्षीय पीडितेने सांगितलं की आम्हा दोन महिलांना बंदुकीचा धाक दाखवून विवस्त्र करण्यात आलं. आम्ही कपडे काढले नाही तर आम्हाला ठार केलं जाईल अशी धमकी देण्यात आली. आम्हाला बंदुकीच्या जोरावर नग्न करुन नाचवण्यात आलं. त्यानंतर आमची विविस्त्र धिंडही काढण्यात आली. पीडित महिलेचे पती आणि लष्करातले निवृत्त जवान यांनी सांगितलं की या घटनेनंतर माझी पत्नी डिप्रेशनमध्ये आहे कारगीलमध्ये जे युद्ध आम्ही केलं त्यापेक्षा ही लढाई भयंकर आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे पीडित महिलेच्या पतीने?

निवृत्त सैनिकाने हे सांगितलं की ३ आणि ४ मे रोजी हजारो लोकांच्या जमावाने नऊ गावांवर हल्लाच केला. त्यांनी घरं जाळली. पाळीव प्राण्यांची हत्या केली. ४ मे रोजी हे लोक आमच्या गावात आले. तिथेही त्यांनी घरं पेटवण्यास सुरुवात केली. सगळेच जण जीव मुठीत घेऊन पळू लागले. त्या गडबडीत माझी पत्नी माझ्यापासून वेगळी झाली. माझी पत्नी जंगलाच्या दिशेने पळाली होती. तिथे गावातल्या काही लोकांसह लपून बसली होती. तिथे हा जमाव गेला त्यांनी माझ्या पत्नीसह इतर लोकांनाही तिथे पकडलं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या.

हे पण वाचा- “मगरीचे अश्रू आता…”, मणिपूर घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर संजय राऊतांचा संताप

निवृत्त सैनिक म्हणाले की मी हे पाहिलं की माझ्या पत्नीसह आणखी दोन महिलांना जमाव दूर घेऊन जातो आहे. तीन महिलांना नग्न होण्यास भाग पाडलं गेलं. ज्या महिलेच्या हाती तिचं मूल होतं तिला या गर्दीपासून काही लोकांनी सोडवलं त्यामुळे ती वाचली. मात्र २१ वर्षांच्या एका मुलीवर सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे की अद्याप बलात्कार झाला आहे की नाही ते समजू शकलेलं नाही. मात्र निवृत्त सैनिकाने सांगितलं की तिथे जी धक्कादायक घटना घडली ती दोन तास सुरु होती. दोन ते तीन तासानंतर जमाव वेगळा झाला. त्यानंतर आम्ही डोंगरांच्या दिशेने गेलो. त्या रात्री मला माझी पत्नी भेटली. सध्या मी आणि माझी पत्नी या मदत कँपमध्येच राहतो आहोत असंही या निवृत्त सैनिकाने सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manipur woman husband army man he said i fought for nation but cud not save family scj