उपचारासाठी सरकारी रूग्णालयामध्ये आलेल्या रूग्णांकडे दुर्लक्ष करत संगणकावर चित्रपट पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रंगेहाथ पकडले. मनीष सिसोदिया यांनी सरकारी रूग्णालयाला अचानक दिलेल्या भेटीमध्ये ही घटना उघड झाली. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची सूचना त्यांनी पर्यवेक्षकाला केली.
मनीष सिसोदिया यांनी अचानक सरकारी रूग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रूग्णांची लांब लागली होती. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे रूग्णांकडे लक्ष नव्हते. सिसोदिया पाहणी करत असताना एक कर्मचारी आपल्या संगणकावर चित्रपट पाहण्यात मग्न होता. हे पाहताच सिसोदिया यांनी त्याला जाब विचारला. या वेळी संबंधित कर्मचाऱ्याची भंबेरी उडाली होती. विभागप्रमुख उपस्थित नसल्यामुळे सिसोदिया यांनी पर्यवेक्षकास दोषी कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची सूचना देत नाराजी व्यक्त केली.
या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आम आदमी पक्षाने (आप) त्यांच्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. आतापर्यंत २० हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून ११ लाखांहून अधिकवेळा तो पाहिला गेला आहे. हजारोंनी त्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी सरकारच्या सजगतेवर आनंद व्यक्त केला आहे.
यापूर्वीही उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारी कार्यालयांची अचानक पाहणी करून कामचुकार कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले होते. कधी नायब राज्यपालांबरोबरील वाद तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका अशा विविध कारणांमुळे आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यापासून सातत्याने चर्चेत अाहे.