नवी दिल्ली : मद्यविक्री घोटाळय़ात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘सीबीआय’ने आरोपी केले आहे. विशेष न्यायालयात मंगळवारी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पहिल्यांदाच सिसोदियांच्या नावाचा समावेश करण्यात आला. यामध्ये ‘भारत राष्ट्र समिती’च्या नेत्या के. कविता यांचे माजी लेखापरीक्षक बुचिबाबू गोरंटला यांचेही नाव सामील करण्यात आले आहे.
या प्रकरणाची ‘सीबीआय’ तसेच, ‘ईडी’ही चौकशी करत असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी २६ फेब्रुवारीला सिसोदियांना अटक झाली व ५६ दिवसांनंतर ‘सीबीआय’ने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ‘सीबीआय’ने २५ नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले होते. पुरवणी आरोपपत्रानंतरही या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे ‘सीबीआय’चे म्हणणे आहे. ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने सिसोदियांचा जामीन अर्जही फेटाळला आहे. सिसोदियांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी त्यांची तिहार तुरुंगात जाऊन चौकशी केली होती. या प्रकरणी ‘ईडी’ने पुरवणी आरोपपत्र दाखल केले असले तरी त्यामध्ये सिसोदियांचा समावेश करण्यात आलेला नाही.दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल तसेच, ‘भारत राष्ट्र समिती’चे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांचीही ‘सीबीआय’ने चौकशी केली होती.