पीटीआय, नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सुमारे पाच तास चौकशी केली. दिल्ली अबकारी धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पुढील काही दिवस ही चौकशी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ईडी’ने या प्रकरणात सोमवारी संध्याकाळी हैदराबादस्थित मद्य व्यावसायिक अरुण रामचंद्र पिल्लईला ताब्यात घेतले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सिसोदिया यांचे जबाब नोंदवण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी तिहार कारागृहात पोहोचले. सिसोदिया यांची सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. बुधवारी व गुरुवारीही त्यांची चौकशी करण्यात येईल. सिसोदिया यांना ‘सीबीआय’ने २६ फेब्रुवारी रोजी २०२१-२२ साठी अबकारी धोरणनिर्मिती व अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली होती. ते २० मार्चपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

जर तपास अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्ती आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात दोषी आहे पण चौकशीला प्रतिसाद देत नाही, याची खात्री पटली तर ‘ईडी’ ‘पीएमएलए’च्या कलम १९ ला लागू करू शकते. त्याअंतर्गत त्याला या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मुभा मिळते. ‘सीबीआय’ने सिसोदिया यांच्या कोठडीत त्यांचे माजी सचिव सी. अरविंद व तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त आरव गोपी कृष्णा यांनाही चौकशीसंदर्भात आणले होते. 

पिल्लईच्या कंपनीचा साऊश ग्रुपशी संबंध?

दरम्यान, प्रदीर्घ चौकशीनंतर मद्य व्यावसायिक अरुण पिल्लई यांना ‘पीएमएलए’च्या फौजदारी कलमांतर्गत सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने पिल्लई यांना १३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडीत पाठवले. या प्रकरणी ‘ईडी’ने अकराव्या व्यक्तीस अटक केली आहे. पिल्लई ‘रॉबिन डिस्टिलरीज एलएलपी’नावाच्या कंपनीत भागीदार आहेत. ‘ईडी’ने दावा केला, की ही कंपनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि विधान परिषद सदस्या के. कविता आणि इतरांशी संबंधित कथित मद्यविक्री समूह ‘साऊथ ग्रुप’चे प्रतिनिधित्व करते. अटक झालेला मद्य व्यावसायिक समीर महंदरू, त्याची पत्नी गीतिका महंदरू आणि त्यांच्या कंपनी ‘इंडोस्पिरिट’ समूहाशीही पिल्लईचा संबंध असल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish sisodia interrogated ed five hours in tihar jail ysh