नवी दिल्ली : साटेलोटे असलेल्या ‘दक्षिण गटा’तील खासगी कंपन्यांना मद्य विक्रीचा घाऊक परवाना देण्याच्या कारस्थानामध्ये मनीष सिसोदिया सहभागी झाले होते.  मद्य विक्रेत्यांचा नफा पाच टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जनतेच्या सल्लाने घेतलेला नव्हता, असा युक्तिवाद सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर, राऊस एव्हेन्यू जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी सिसोदियांना १७ मार्चपर्यंत सात दिवसांची ‘ईडी’ कोठडी  सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी अर्थ व महसूलमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘सीबीआय’ने यापूर्वीच अटक केली होती.  ‘आप’ सरकारने उत्पादन शुल्क धोरणात बदल करताना घाऊक मद्यविक्रेत्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात १०० कोटींची लाच घेतल्याचा संशय असून या प्रकरणी ‘ईडी’चीही समांतर चौकशी सुरू आहे. ‘ईडी’ने सिसोदियांना गुरुवारी रात्री अटक केली. सध्या सिसोदिया तिहार तुरुंगात असून ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.

के. कविता यांच्या अटकेची शक्यता?

मद्य विक्री घोटाळय़ामध्ये सिसोदियांच्या वतीने त्यांचे सहकारी विजय नायर हे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल तसेच सिसोदियांच्या वतीने मध्यस्थी करत होते. या प्रकरणामध्ये ‘भारत राष्ट्र समिती’च्या नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांचाही समावेश होता, असा उल्लेख ‘ईडी’चे वकील झोहेब हुसैन यांनी केला. कविता यांची शनिवारी ईडी चौकशी करणार असून त्यांच्याही अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. कविता यांची ‘सीबीआय’ने यापूर्वी चौकशी केलेली आहे.

सिसोदिया यांच्या विरोधातील मुद्दे

मंत्रिगटाच्या बैठकीच्या इतिवृत्तात, नफ्याचे प्रमाण वाढवण्याच्या निर्णयाचा उल्लेख नाही. हा निर्णय दक्षिणेतील मद्यविक्रेत्या कंपन्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी परस्पर घेतला गेला.

 कथित दक्षिण गटातील कंपन्यांना दिल्लीमधील नऊ विभागांतील घाऊक मद्यविक्रीचे परवाने दिले गेले.

सिसोदियांच्या १४ फोनपैकी फक्त दोन ताब्यात घेता आले. सिसोदियांनी दुसऱ्याच्या नावे फोन व सिम खरेदी केले. स्वत:चे फोन नष्ट केले.

हा घोटाळा सुमारे २९२ कोटींचा असून सिसोदिया व दक्षिण गटातील खासगी कंपन्यांच्या हितसंबंधांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish sisodia remanded in ed custody for seven days amy