दिल्लीच्या मद्य धोरणाच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे तीन पानी राजीनामा सोपवला आहे. आपल्या राजीनाम्यात मनिष सिसोदियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. तसंच आपल्या राजीनाम्यात त्यांनी आपल्या वडिलांच्या शिकवणुकीचाही उल्लेख केला आहे. दिल्लीकरांना हे माहित आहे की मागची आठ वर्षे दिल्लीतल्या केजरीवाल सरकारने खूप चांगलं काम केलं आहे.
काय म्हटलं आहे मनिष सिसोदियांनी?
मी जेव्हा सहावीत होतो तेव्हा मला माझ्या वडिलांनी भगवान कृष्णाचा एक सुंदर फोटो फ्रेम करून माझ्या पलंगाच्या समोर लावला होता. त्या फोटोच्या खाली एक वाक्यही लिहिलं होतं की जे काम करशील ते पूर्ण इमानदारीने आणि निष्ठेने कर असं करणं हीच कृष्णाची पूजा आहे. हे वाक्य वडिलांनी लिहिलं होतं असं सिसोदियांनी म्हटलं आहे.
माझ्या आई वडिलांनी मला जे शिकवलं आहे माझ्यावर जे संस्कार केले आहेत ते संस्कार माझी ताकद आहेत. ही ताकद माझी निष्ठा कधीही कमी करू शकणार नाही. मी गेल्या आठ वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे काम करूनही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आहेत. हे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. अरविंद केजरीवाल यांचा सच्चेपणा आणि सचोटीचं राजकारण याला घाबरलेले लोक आमच्याविरोधात हा कट रचत आहेत असंही सिसोदियांनी म्हटलं आहे. देशभरात आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. गरीबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारखे अनेक प्रश्न आहेत. मात्र यांचे जुमले थांबतच नाहीत असंही सिसोदियांनी म्हटलं आहे.
मनिष सिसोदिया आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की माझ्या विरोधात अनेक FIR केल्या गेल्या आहेत. तसंच यापुढेही त्या केल्या जातील. मला घाबरवलं, धमकावलं, आमीष दिलं. मात्र मी त्यांच्यासमोर झुकलो नाही. त्यानंतर मला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. मला तुरुंगात जाण्याची भीती नाही. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळीही इंग्रजांनी अनेक निरपराध लोकांना अटक करून तुरुंगात डांबलं होतं. काहींना तर फाशीही दिली होती.
माझ्या विरोधात जे काही आरोप केले आहेत, मात्र काळ सगळं वास्तव समोर आणेल याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. मला आता मंत्रिपदावर राहण्याची इच्छा नाही. या पत्राद्वारे मी माझा राजीनामाच देतो आहे असंही सिसोदियांनी म्हटलं आहे.