तथ्य नसल्याचा व्ही. के. सिंग यांचा दावा ; मनीष तिवारी मात्र ठाम
केंद्र सरकारला सूचना न देता लष्कराच्या दोन तुकडय़ांनी २०१२ साली दिल्लीच्या रोखाने आगेकूच केल्याबद्दल ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेले वृत्त खरे होते, या काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केलेल्या दाव्याचे तत्कालीन लष्करप्रमुख आणि सध्याचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंग यांनी खंडन केले आहे. तसेच काँग्रेसनेही त्या बातमीत काही तथ्य नव्हते, अशी भूमिका घेतल्याने तिवारी आपल्याच पक्षात एकाकी पडले आहेत. तिवारी मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असून ती बातमी खरीच असल्याचे सांगत आहेत.
सिंग यांच्या जन्मतारखेवरून त्या वेळी वाद सुरू होता आणि ते त्यावरून सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्याच रात्री म्हणजे १६ जानेवारी २०१२ रोजी हिसार आणि आग्रा येथून लष्कराच्या दोन तुकडय़ा दिल्लीतील रायसीना हिलच्या रोखाने कूच करत असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांनी दिली होती.
मात्र केंद्र सरकारला त्याची पूर्वकल्पना दिली नव्हती, अशा आशयाची बातमी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ४ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यात सिंग बंड करण्याच्या तयारीत होते असे सुचवले जात होते. तिवारी यांनी शनिवारी दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या वेळी या विषयाला उजाळा देत ती बातमी दुर्दैवी असली तरी खरी होती. आपण ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री तसेच संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य होतो, असे म्हटले होते.
तिवारी यांनी केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसला डोकेदुखी झाली आहे. सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केल्याच्या आरोपात काही तथ्य नाही. माझे सहकारी असलेले तिवारी हे सुरक्षाविषयक संसदीय स्थायी समितीत किंवा तत्सम कुठल्याही इतर समितीत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य खरे नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’चे तत्कालीन संपादक शेखर गुप्ता यांनी सांगितले की, तिवारी यांनी जे शब्दांचे युद्ध छेडले आहे, त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. माझ्या बातमीला ती खरी होती याचे प्रमाणपत्र देण्याची कुणी गरज नव्हती, पण आता तिवारी यांनी तसे विधान करून ती बातमी खरी असल्याचे सांगितले. माझ्या दृष्टीने हे शिक्कामोर्तब महत्त्वाचेच आहे. भारतीय प्रणालीत जे काही घडते त्याचा सरकार नेहमी इन्कारच करते, त्या प्रकरणातही सरकारने तेच केले कारण तशी घटना घडणे शोभादायी नव्हते.