श्रीलंकेतील तामिळी समस्येच्या मुद्दय़ावरून द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता समाजवादी पार्टीही सरकारच्या खुर्चीखालील जाजम काढून घेण्याची शक्यता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वर्तविली. मात्र, मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यताही वर्तविली. हवाई दलाच्या विमानातून प्रवास करताना ते बोलत होत़े
दरम्यान, द्रमुकने यूपीएचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसनेही केली असून त्यामुळे राजधानीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या विकासात केंद्राचा नेहमीच सहभाग राहील, असे आश्वासन देत समाजवादी पार्टीला काहीसे चुचकारण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शुक्रवारी लखनौ येथील एका कार्यक्रमात केला.
द्रमुकप्रमाणेच समाजवादी पार्टीही सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असली तरी आपल्या सरकारला कसलाही धोका नसल्याचे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. आपल्या सरकारने सुधारणा राबविण्याचा ठाम निर्धार केला असून येत्या काही महिन्यांत त्याचे प्रत्यंतर येईल, असे ते म्हणाले. समाजवादी पार्टीचे लोकसभेत २२ सदस्य आहेत. आघाडी सरकारसमोर काही समस्या निश्चित असतात. परंतु आपले सरकार निश्चितपणे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील आणि लोकसभेच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच २०१४ मध्ये पार पडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी डर्बन येथून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यूपीएतील एकामागून एक घटक पक्ष सरकारची साथ सोडत आहेत, त्यामुळे आपल्या मित्र पक्षांना बांधून ठेवण्याकामी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वास अपयश आले आहे काय, असे विचारले असता, आपल्याला हे मान्य नसल्याचे मनमोहन सिंग यांनी ताडकन सांगितले.
मुलायम यांचा ‘कृतघ्न’पणाचा आरोप
समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी आता यूपीएवर कृतघ्नतेचा आरोप करीत तोफ डागली आहे. विद्यमान सरकारच्या कसोटीच्या काळात मी त्यांना साथ दिली, मात्र त्याच काँग्रेसने माझ्यामागे सीबीआयचे शुक्लकाष्ठ लावले, असा आरोप सिंग यांनी केला.
धाक दाखवून पाठिंबा मिळवणे ही काँग्रेसची वृत्तीच आहे. यूपीए सरकार सत्तेत राहू शकेल की नाही अशा दोलायमान अवस्थेत असताना मीच या सरकारला पाठिंबा देऊन तारले आणि आज याच सरकारने माझ्यामागे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावला आहे, असा आरोप मुलायम सिंग यांनी केला. मुलायम सिंह यांच्यावर ‘दलाली’चा आरोप करणारे केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांच्यावरही मुलायम यांनी शरसंधान केले. राहुल गांधी हे देशाचे भावी पंतप्रधान आहेत वगैरे विधाने करण्याचा बेनी प्रसाद यांनी कितीही प्रयत्न केला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव त्यांना रोखता येणार नाही, असे मुलायम म्हणाले.प्रसारमाध्यमेही आपली बाजू समजून घेत नसून उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय अनावश्यकपणे त्यांच्याकडून लावून धरला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. माझ्यावर ‘दलालीचे’ आरोप करणाऱ्यांनी स्वपक्षाचे अवलोकन करावे, कारण हा आरोप करणारे सोयीस्करपणे विसरतात की, यातून काँग्रेसच लाच देऊ पाहत असल्याचा प्रचार आपण नकळतपणे करीत आहोत, असे मुलायम म्हणाले.
चिदम्बरम यांचे ‘सहकार्या’चे आश्वासन
समाजवादी पार्टी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन चिदम्बरम यांनी शुक्रवारी लखनौ येथे दिले.
उत्तर प्रदेशातील बँकांच्या ३०० शाखांचे उद्घाटन करताना चिदम्बरम यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांना हा निर्वाळा दिला. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी केंद्र सरकार बांधील आहे, असे अर्थमंत्री म्हणाले. राज्यात १८ हजार ५०० कोटी रुपयांच्या केंद्रीय योजनांची अंमलबजावणी होत असून उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यांना मदत करण्यास आम्ही बांधील आहोत, असे सांगून चिदम्बरम यांनी अखिलेश यादव यांची स्तुतीही केली. अखिलेश हे युवा मुख्यमंत्री राज्य वरती आणण्याकामी सर्वतोपरी प्रयत्न करतील, याकामी ते सक्षम आहेत, असे चिदम्बरम यांनी नमूद केले.
तृणमूलला सरकारचा राजीनामा हवा
द्रमुक पक्षाने यूपीएचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारने तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी केली. मनमोहन सिंग सरकार आता अल्पमतात आले असून केवळ संख्याबळाची कसरत करून ते सत्तेवर राहिले असले तरी त्यांना आता एक क्षणही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तेव्हाच ते अल्पमतात आले होते, असे पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस मुकुल रॉय यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा