Former PM Manmohan Singh Dies : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्यत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मनमोहन सिंग यांना रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
काय आहे राहुल गांधींची पोस्ट?
“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.
हे पण वाचा- Manmohan Singh : विराट, उपवास अन् पंतप्रधान मनमोहन सिंग…
मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ होती
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तसंच युपीएच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे.