नरेंद्र मोदी हे स्वप्नांची विक्री करणारे व्यापारी असून त्यांच्या आश्वासनांची यादी कधीच संपणार नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते आसाम निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला अनेक मुद्द्यांवरून लक्ष्य केले. मोदी सरकारचे पाकिस्तानबाबतचे धोरण पूर्णपणे भरकटले असून देशवासियांना दिलेले वचन पूर्ण करण्यात मोदी सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मोदी सरकारच्या पाकिस्तानसंदर्भातील धोरणाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. यापूर्वी दहशतवाद्यांच्या कारवाया जम्मू-काश्मीरपर्यंत मर्यादित होत्या. मात्र, आता दहशतवादी थेट पंजाब आणि आजुबाजूच्या परिसरात जाऊन पोहचल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले. नुकताच झालेला पठाणकोट हल्ला हे त्याचे मर्मभेदी उदाहरण असल्याचे सिंग यांनी म्हटले. याशिवाय, आर्थिक आणि कृषी पातळीवरही गेली दोन वर्षे मंदी आणणारी असून त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना नैराश्य आले आहे. नरेंद्र मोदींचे परदेश दौरे यांच्या परदेश दौऱ्यांचा नेहमीच मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, या दौऱ्यांमुळे फार काही हाती लागलेले नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय, मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काळा पैसा देशात परत आणण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र, दुर्देवाने हे वचन पाळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. स्वप्नांची विक्री करणारा व्यापारी नेमके हेच करतो आणि मोदींच्या आश्वासनांची यादी न संपणारी असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले.

Story img Loader