पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अकार्यक्षम असल्यामुळेच देशवासीय नरेंद्र मोदींकडे मोठ्या अपेक्षेने बघत असून, मनमोहनसिंग काहीच करीत नसल्यामुळे लोक मोदींना आणा… मोदींना आणा, असे म्हणत आहेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण शौरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. मनमोहनसिंग हेच नरेंद्र मोदी यांचे ‘इलेक्शन एजंट’ असल्याची टीकाही शौरी यांनी केली.
मोदींमुळे सामाजिक सलोखा संपुष्टात येईल आणि ते समाजात फूट पाडतील, या टीकेलाही शौरी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले, देशाला सध्या समाजात फूट पाडणारा नेता नकोच आहे. मात्र, त्याचबरोबर समाजाला निर्णय घेणारा नेता हवाय, हेदेखील तितकेच पक्के आहे. निर्णय कसे घ्यायचे हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.
अन्नसुरक्षा योजनेचे गंभीर परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतील. पुढील काळात भारतीय अर्थव्यवस्था आणखी अडचणीत येईल, असेही भाकीत शौरी यांनी यावेळी व्यक्त केले. यूपीए सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयकावर त्यांनी टीका केली.
भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना स्वतःमागे खंबीरपणे उभे करण्यात मोदी यशस्वी होतील का, या प्रश्नावर त्यांनी कोणत्याच राज्यावर प्रभाव नसलेल्या नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही, असे सांगून मोदी यांची आपण दिल्लीतील कोणत्याही नेत्याबरोबर तुलना करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader