नवीन जिंदाल समूहाच्या कंपनीला कोळशाची खाण देण्याच्या प्रक्रियेची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पूर्ण कल्पना होती, असा दावा झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी बुधवारी विशेष न्यायालयात केला.
डॉ. मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून पाचारण करावे, अशी मागणी करणाऱ्या कोडा यांनी म्हटले आहे की, झारखंडमधील अमरकोंडा मुरगंदल कोळशाची खाण जिंदाल समूहाला देण्याची योजना आखण्यात आली होती तर त्याबाबत माजी पंतप्रधान अनभिज्ञ होते, असे म्हणता येणार नाही, कारण त्या वेळी तेच कोळसा खात्याचे मंत्रीही होते.
आपल्याला अंधारात ठेवले होते, असा बचावात्मक युक्तिवाद डॉ. मनमोहन सिंग करू शकत नाहीत, कारण त्यांना संपूर्ण प्रक्रियेची कल्पना होती आणि त्यानुसारच जिंदाल समूहाला खाण देण्यात आली, असे कोडा यांचे वकील म्हणाले. माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांची जिंदाल समूहाला खाण देण्याची इच्छा होती, असे सीबीआयचे म्हणणे आहे, मात्र समूहाला प्रत्यक्ष खाण देण्यामागे माजी पंतप्रधानांचा हात आहे, कारण त्यांनीच ती मंजूर केली होती, असेही वकील म्हणाले.

Story img Loader