आर्थिक सुधारणांची व्याप्ती व गती वाढविण्याची हमी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी उद्योग व व्यापार क्षेत्रातील धुरीणांना दिली. पंतप्रधानांच्या व्यापार व उद्योग मंडळाची बैठक सोमवारी झाली. त्यावेळी आर्थिक सुधारणांना सरकार बांधील असून उद्योजकांच्या तक्रारींची तड लावली जाईल तसेच गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी पावले उचलली जातील, असे सिंग यांनी सांगितले.
पुढील दोन-तीन महिन्यांत उद्योगवाढीसाठी नेमके काय करायला पाहिजे, याबाबतचा अहवाल महिनाभरात तयार करण्यास पंतप्रधानांनी सांगितले आहे. सरकारने आर्थिक सुधारणांसाठी निर्भयतेने पावले उचलावीत, अशी अपेक्षा रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि भारती ग्रुपचे सुनिल मित्तल यांनी या बैठकीत व्यक्त केली. नियंत्रक अधिकारांच्या स्वरूपात उद्योगवृद्धीच्या मार्गात अद्यापअनेक अडथळे असून ते वेगाने हटवावेत, असे मत उद्योजक राहुल बजाज यांनी व्यक्त केले. उद्योग क्षेत्राला योजनांच्या शाब्दिक हमीची नव्हे तर तातडीच्या अंमलबजावणीची इच्छा आहे, असे मत ‘फिक्की’च्या अध्यक्षा व एचएसबीसीच्या भारतातील प्रमुख नैेना लाल किडवाई यांनी मांडले.  अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी आर्थिक सुधारणांसाठीसरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आर्थिक सुधारणांसंबंधात शैथिल्य आल्याच्या दाव्यात तथ्य नसून सरकार या सुधारणांसाठी नेहमीच प्रयत्नरत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Story img Loader