Dr. Manmohan Singh Dies at 92 : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. मनमोहन सिंग हे उत्तम अर्थतज्ज्ञ होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही त्यांच्या पुस्तकात मनमोहन सिंग बोलतात तेव्हा जग ऐकत असतं असं म्हटलं होतं. त्याची आठवण या निमित्ताने सगळ्यांना झाली आहे.
काय म्हटलं होतं बराक ओबामांनी?
ओबामा यांनी त्यांच्या A Promised Land या पुस्तकात मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं होतं. हे पुस्तक २०२० मध्ये प्रकाशित झालं होतं. यामध्ये बराक ओबामा म्हणाले की मनमोहन सिंग हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचे इंजिनिअर आहेत. त्यांनी लाखो भारतीयांना गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचं काम केलं. मनमोहन सिंग हे बुद्धिमान, विचार करणारे आणि राजकीयदृष्ट्या प्रामाणिक व्यक्ती आहेत. भारताच्या आर्थिक विकासाचा पाया त्यांनी रचला. २०१० मध्ये मनमोहन सिंग यांच्या भेटीनंतर ओबामा म्हणाले होते की भारताचे पंतप्रधान जेव्हा बोलतात तेव्हा सगळं जग ऐकत असतं. २०१० मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते. टोरँटो येथील जी २० परिषदेत ते सहभागी झाले होते त्यावेळी ओबामा आणि त्यांची भेट झाली होती.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय?
“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.
मनमोहन सिंग यांची व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द
१९५७ ते १९५९ या कालावधीत अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले.
१९६३ ते १९६५ या काळात प्राध्यापक होते.
१९६६ मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक होते.
१९६६ ते १९६९ पर्यंत UNCTD सोबत काम केले.
१९६९ ते १९७१ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राध्यापक म्हणून काम केले.
मनमोहन सिंग यांची ललित नारायण मिश्रा यांनी परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
१९६९ मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते.
१९७२ मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले.
१९७६ मध्ये अर्थ मंत्रालयात सचिव होते
१९७६ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते.
१९७६ ते १९८० या कालावधीत मनमोहन सिंह भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते.
१९८२ ते १९८५ या तीन वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंह यांनी RBI चे गव्हर्नर म्हणून काम केलं.
१९८५-१९८७ या कालावधीत मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
१९८७ ते १९९० या कालावधीत मनमोहन सिंह दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
१९९१ मध्ये केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.
२००४ ते २०१४ या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान होते.
मनमोहन सिंग यांनी १९६४ मध्ये ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ – सस्टेन्ड ग्रोथ’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.