येत्या १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार. यामध्ये पंजाबमधील १३ जागांसह ८ राज्यातील एकूण ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेसला मतदान करावे, असं आवाहन केलं आहे. तसेच लोकशाही वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीकाही केली आहे.
मनमोहन सिंग यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“येत्या १ जून रोजी देशात सातव्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. देशातील लोकशाही वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. जनतेने या संधीचा फायदा घ्यावा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यांसाठी काँग्रेसला मतदान करावे”, असं आवाहन मनमोहन सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केलं आहे.
हेही वाचा – मुस्लिमांचा संपत्तीवर पहिला अधिकार? मोदींच्या आरोपावर मनमोहन सिंगांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरून मोदी सरकावर टीका
या पत्रात त्यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीकाही केली आहे. “नोटबंदीचा चुकीचा निर्णय, चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेला जीएसटी आणि करोना काळातील चुकीचं व्यवस्थापन यामुळे देशाची अर्थव्यवस्था कमजोर झाली आहे. भाजपा सरकारच्या काळात जीडीपीचा दर ६ टक्क्यांच्याही खाली गेला आहे. यूपीए सरकारच्या काळात हा दर ८ टक्के इतका होता. देशात बेरोजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे”, असे ते म्हणाले.
अग्नीवीर योजनेवरूनही केलं लक्ष्य
पुढे या पत्रात त्यांनी अग्नीवीर योजनेवरूनही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मोदी सरकारने सशस्त्र दलांसाठी अग्नीवीर योजना आणली. भाजपाला वाटते की देशभक्तीचं मुल्य केवळ ४ वर्ष आहे. यावरून भाजपा मनातील पोकळ देशभक्ती दिसून येते”, अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न
मनमोहन सिंग यांनी या पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन केल होते. यात जवळपास ७५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यापैकी अनेक जण पंजाब आणि शेजारच्या राज्यातील होते. निर्दयी मोदी सरकारने आपल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. तसेच त्यांच्यावर अश्रूगोळे फेकले. पंतप्रधान मोदी यांनी २०२२ साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू तसे झाले नाही. याउलट गेल्या १० वर्षातील चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले”, असे ते म्हणाले.