पंतप्रधान मनमोहन सिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज त्यांच्यातील भेटीत द्विपक्षीय संबंधातील प्रगतीबाबत एकमेकांची प्रशंसा केली. धोरणात्मक भागीदारी आणखी कशी वाढवता येईल यावर उभय नेत्यांनी दिलखुलास चर्चा केली.
भारत हा आमचा सामरिक व धोरणात्मक भागीदार असून तुमच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशातील संबंधात जी प्रगती झाली आहे ती प्रशंसनीय आहे असे पुतिन यांनी या भेटीत सांगितले. दोन्ही देशांचे लष्करी व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य आहे व ते आता आर्थिक क्षेत्रातही वाढत आहे असे सांगून ते म्हणाले की, सध्या भारतात संयुक्तपणे दहशतवादविरोधी मोहिमांचा सराव चालू आहे. दोन्ही देशांमध्ये राजकीय सहकार्य असून संयुक्त राष्ट्रे व ब्रिक्समध्ये त्यांनी एकमेकांची साथसंगत केली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील द्विपक्षीय भागीदारी वाढण्याचे श्रेय पुतिन यांना असून आपण त्यांचे आभारी आहोत. त्यांनी भारताच्या बाबतीत व्यक्तीगत स्वारस्य दाखवले असून वचनबद्धताही पाळली आहे. रशियन संघराज्याबरोबर भारताचे संबंध हे आमच्या परराष्ट्र धोरणात अग्रक्रमावर आहेत. रशियाशी आमची कालातीत मैत्री असून ती जगात अनेक बदल होत असतानाही नेहमीच मजबूत आहे. दुसऱ्या कुठल्याही देशाबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध एवढय़ा उच्च पातळीचे नाहीत. संरक्षण, ऊर्जा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यटन, व्यापार व गुंतवणूक या क्षेत्रात दोन्ही देशांतील संबंधात होत असलेल्या प्रगतीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.भारत व रशिया यांनी ब्रिक्स, जी २० व पूर्व आशिया शिखर बैठक अशा अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केलेले सहकार्य हे मोठेच आहे. दोन्ही देशांतील भागीदारी विशेष असून गेली अनेक वर्षे अध्यक्ष महोदय आपण गेल्या काही काळात मोठे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.
सीरियातील पेचप्रसंगात पुतिन यांनी पार पाडलेल्या भूमिकेचे पंतप्रधान सिंग यांनी कौतुक करताना सांगितले की, सीरियातील प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यात त्यांची कामगिरी मोलाची आहे. अमेरिका व रशिया यांनी सीरियातील रासायनिक अस्त्रे कालबध्द पद्धतीने नष्ट करण्यासाठी केलेला करार उल्लेखनीय आहे असे डॉ.सिंग म्हणाले.

Story img Loader