भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या आर्थिक प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता. उच्चशिक्षित असलेले डॉ. मनमोहन सिंग कमी बोलत असत, पण त्यांच्या कामाची गती वाखणण्याजोगी होती. त्यामुळे माझ्या कामाची दखल आजच्या समकालीन माध्यमांनी नाही घेतली तरी इतिहास नक्की घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक विशेष गुणांविषयी चर्चा होत असताना त्यांच्या काही खासगी गोष्टीही समोर येऊ लागल्या आहेत. प्रसिद्ध लेखिका आणि मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल’ या पुस्तकातील काही संदर्भ इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.
निरागस आणि लाजाळू पत्नी
मनमोहन सिंग यांच्या पत्नीचं नाव गुरशरण कौर. गुरशरण कौर यांना लग्नासाठी फक्त देखणा मुलगा हवा होता. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असला तरीही चालेल. फक्त पतीला संगीताची आवड हवी. कारण गुरशरण कौर या उत्तम गात असत. मनमोहन सिंग यांनाही गुरशरण कौर पहिल्याच भेटीत आवडल्या. त्यांना वाटलं की गुरशरण खूप सुंदर आहे. त्या अत्यंत निरागस आणि काहीशा लाजाळू आहेत. लग्न ठरवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी आधी खालसा कॉलेजच्या प्राचार्यांशी चर्चा केली. या चर्चेतून त्यांना समजलं की त्यांची होणारी पत्नी कॉलेजमधील अॅव्हरेज स्टुडंट होती. हे ऐकल्यावर त्यांना अधिक समाधान वाटलं, असं या लेखात म्हटलं आहे.
हेही वाचा >> डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ज्येष्ठ कन्येकडून मुखाग्नी
मनमोहन सिंग यांनी पत्नीला भांडी घासण्यास केली मदत
दरम्यानच्या काळात गुरशरण कौर या स्वयंपाक घरात रमल्या. आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात त्यांचा वेळ जाऊ लागला. याबाबत त्यांच्या मुलींनी मनमोहन सिंग यांना मिश्किलीत जाब विचारला होता. आईला स्वयंपाक घरात किती काम करावं लागलं, याबद्दल वाईट वाटलं का असं विचारल्यावर मनमोहन सिंग अत्यंत नम्रपणे हो म्हणाले होते. तसंच, तुम्ही त्यांना काही मदत केली होती का? असं विचारल्यावर ते म्हणाले, “मी तिला भांडी घासायला मदत करत असे.”
“सरकारी आचार विचारांचे नियम ते काटेकोरपणे पाळत असत. घराणेशाही, पक्षपात त्यांनी टाळला होता. तसंच कौटुंबिक व्यवहारातूनही ते कुठेतरी मागे हटले होते. ते घरातील कामांबाबत पूर्णपणे असहाय्य होते. त्यांना अंडीही उकडता येत नव्हती की टीव्ही चालू करता येत नव्हता”, असं दमन सिंग म्हणाल्या. त्यांचं त्यांच्या चालण्यावरही नियंत्रण नव्हतं. ते एकदा चालायला लागले की वेगाने पुढे जात असत, असंही त्यांनी म्हटलंय.