गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते देशासाठी घातक ठरेल, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष तपास यंत्रणा आणि न्यायालयाने मोदी यांना निर्दोष ठरविले असतानाही पंतप्रधानांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून भाजपने त्याचा तीव्र निषेध केला आहे.
यूपीएमध्ये दोन सत्ताकेंद्रे आहेत, असे वक्तव्य डॉ. सिंग यांनी केले आहे त्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपनेही सातत्याने दोन सत्ताकेंद्रांचा मुद्दा उपस्थित केल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.
यूपीएला सरकार स्थापनेची तिसरी संधी मिळणार नसल्याचे पंतप्रधानांनी गृहीत धरले असून त्यामुळेच त्यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे वक्तव्य केले आहे, असेही भाजपचे अध्यक्ष म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांनी देशापुढे विकासाचे एक मॉडेल ठेवले असतानाही पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे हास्यास्पद असल्याचेही ते म्हणाले.
दोन सत्ताकेंद्रे असल्याने या सरकारकडून आपण कसलीही अपेक्षा करू शकणार नाही, असे भाजप सातत्याने सांगत आला असून शुक्रवारी त्यावर पंतप्रधानांनीच शिक्कामोर्तब केले आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच हिरावले गेले आहे, असेही राजनाथ सिंग म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला २७२ पेक्षा जास्त जागा- राजनाथ सिंह
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा