छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : ‘भाषा, संस्कृती भिन्न असली, तरी माणूस आतून एकच असतो. प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते. भारतीयत्वाचा धागा जुळल्यानंतर प्रांत आणि भाषेचा अडथळा ओलांडून सहजीवन आनंदी होते. भाषेचा सातत्याने आणि दक्षतेने वापर झाल्यास ती आपोआप आत्मसात होऊन तिचे संस्कार रुजत जातात,’ असा सूर ‘मनमोकळा संवाद-मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादात शनिवारी उमटला.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे-डॉ. साधना शंकर, राजदीप सरदेसाई-सागरिका घोष, रेखा रायकर-मनोजकुमार, डॉ. मंजिरी वैद्या-प्रसन्ना अय्यर यांच्याशी अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी या परिसंवादात संवाद साधला. आमदार डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

● राजदीप सरदेसाई यांनी सागरिका घोष यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. ‘माझ्या लेखनाचे पहिले समीक्षण सागरिकाच करते,’ असा कौतुकाने उल्लेख केला. ‘आमच्या घरात बंगाल आणि महाराष्ट्र यांचे द्वंद सुरूच असते,’ असे सागरिका घोष म्हणाल्या. ‘बातमी ही जणू माझी सवतच आहे,’ अशी गोड तक्रारही त्यांनी केली.

● ‘साधना उत्तम कलाकार आणि लेखिका आहे. माझी ओढ अजूनही गावच्या मातीत रुजलेली आहे, तर साधना उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी वातावरणात वाढलेली आहे, तरीही ती आवडीने खेड्यात रमते,’ असे सांगून डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, ‘माझ्या फक्त मराठी बोलणाऱ्या आईशी तिचे अनुबंध जुळले होते. नोकरीच्या निमित्ताने देश-परदेशात वास्तव्य असल्याने आमची मुले बहुभाषिक बनली आहेत.’

● डॉ. साधना शंकर म्हणाल्या, ‘ज्ञानेश्वर यांचा भक्कम पाठिंबा आमच्या संसाराला लाभला आहे. आमचे नाते म्हणजे माझ्या बाजूने ‘लव्ह अॅण्ड हेट’, तर त्यांच्याकडून ‘टॉलरेट’ असे असल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

● ‘‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन’ हा मनोज यांचा मराठी बाणा मला विशेष भावला,’ असे रेखा रायकर म्हणाल्या. ‘लहान वयातच विविध भाषांचे संवादरूप संस्कार झाल्यास बहुभाषकत्व आत्मसात होते. लग्नानंतर काही प्रमाणात तडजोडी करताना पतीची भक्कम साथ लाभल्यास स्त्रीला बदल स्वीकारणे सुकर जाते,’ असे त्या म्हणाल्या.

● मनोजकुमार म्हणाले, ‘रेखा कुटुंबात रमणारी असून, तिच्या हाताला उत्तम चव आहे. भाषा, संस्कृती याचा प्रत्येक व्यक्तीला अभिमान असणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे कौतुकास्पद आहे. मराठी बोलता येत नसले, तरी मला मराठी चित्रपट आणि नाट्यकृती पाहायला मनापासून आवडते.’

● ‘माझ्यातील कलाकाराचा प्रसन्ना उत्तम सांभाळ करतात,’ असे सांगून मंजिरी वैद्या म्हणाल्या, ‘मुलांवर भाषेचे उत्तम संस्कार केल्यास ते बहुभाषिक बनतात. बहुभाषिक असल्यामुळे व्यक्तीमध्ये विविध संस्कृतींचा मिलाफ होतो.’ ‘मंजिरीचे गाणे ऐकले, तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. मी तमीळ असलो, तरी माझी जडणघडण महाराष्ट्रातच झाल्याने आमच्यावर भिन्न संस्कार झालेले नाहीत. त्यामुळे आमचे सूर सहजतेने जुळले,’ असे प्रसन्ना अय्यर म्हणाले.

● डॉ. विश्वजित कदम म्हणाले, ‘माझा विवाह मराठी आणि त्यातही पुण्यातील मुलीशी झाल्याने मला भाषा, संस्कार, रीतीभाती यांच्या आंदोलनांना सामोरे जावे लागले नाही. परंतु, पतीला असलेला पत्नीचा प्रेमळ धाक मी आनंदाने सहन करतो.’