पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी हा नियम पाळला आहे. याच ‘मन की बात’चा आज १०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. रेडिओच्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या या संवादाचा १०० वा कार्यक्रम दणक्यात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुंबई भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. शहर व उपनगरात पाच हजाराहून अधिक ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी अकरा वाजता करण्यात आले. मन की बात हा कार्यक्रम ऐकण्याासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. विले पार्ले येथे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले, तुम्ही पाठवलेली पत्रं वाचून मी भावूक झालो. माझ्यासाठी हा कार्यक्रम आता एक पर्व बनलं आहे. या कार्यक्रमाने मला तुमच्यासोबत जोडून ठेवलं आहे. या कार्यक्रमामुळे मी तुमचे विचार समजू शकलो. मन की बात आता माझ्यासाठी कार्यक्रम नसून पूजा आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगदरम्यान मी खूप वेळा इतका भावूक झालो की त्या कार्यक्रमाचं पुन्हा रेकॉर्डिंग करावं लागलं. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फी विथ डॉटर या मोहीमेचा यावेळी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, ही मोहीम भारतासह परदेशातही खूप नावाजली गेली. हा सेल्फीचा मुद्दा नव्हता तर मुलींशी संबंधित होता. यात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले. मन की बात हा कार्यक्रम म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या मनातली गोष्ट आहे. त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण ३ ऑक्टोबर २०१४ रोजी हा ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटातील लोक ‘मन की बात’मध्ये सहभागी झाले. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनले. मी एकदा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ‘मन की बात’बद्दल काही गोष्टी शेअर केल्या, तेव्हा या कार्यक्रमाची जगभरात त्याची चर्चा झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mann ki baat 100 episode pm narendra modi says i get emotional many times asc