पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या दर रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी हा नियम पाळला आहे. याच ‘मन की बात’चा उद्या, रविवारी १०० वा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. रेडिओच्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या या संवादाचा १०० वा कार्यक्रम दणक्यात करण्याकरता भाजपाच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, देशासह परदेशातही एकूण ४ लाख ठिकाणी हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी ऐकण्याकरता नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
इंडियन एक्स्प्रेसला भाजपा महासचिव दुष्यंत गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “परदेशासह देशभरात जवळपास ४ लाख ठिकाणी मन की बात ऐकण्याकरता नियोजन करण्यात आले आहे. सर्व खासदार, आमदार आणि अन्य सदस्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भाजपाचे प्रमुख जे. पी. नड्डा हा कार्यक्रम ऐतिहासिक होण्याकरता सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपावण्यात आली आहे.”
हेही वाचा >> “आमचे आंदोलन कमजोर करू नका…”, विनेश फोगाट यांची बबिता फोगाट यांना हात जोडून विनंती; म्हणाल्या…
“दुसऱ्या देशातील भारतीय राजदुतांवरही ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचा हा कार्यक्रम राजभवनात होणार असून पद्म पुरस्कार विजेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे”, अशीही माहिती देण्यात आली.
दुष्यंत गौतम यांनी सांगितलं की, “सत्तेत आल्यानंतर ऑक्टोबर २०१४ पासून मन की बातला ५२ भारतीय भाषा आणि ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावरील विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रियाही भाजपा नेत्यांकडून येत आहे.”