ललित मोदी प्रकरणावरून सध्या देशातील वातावरण सध्या तापलेले  आहे. तसेच, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, स्मृती इराणी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी संबंधीत वादग्रस्त मुद्दयांवर मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून संवाद साधला. आकाशवाणीच्या माध्यमातून पंतप्रधान देशभरातील जनतेशी दर महिन्याला संवाद साधत असतात. या कार्यक्रमादरम्यान अनेक महत्वांच्या मुद्यावंर ते आपले विचार मांडत असतात.
आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी ललित मोदी यांच्यावरून सुषमा स्वराज, वसुंधरा राजे या भाजपा नेत्या अडचणीत सापडलेले आहेत. यावर पंतप्रधानांना मौन सोडण्याचे आवाहन विरोधकांनी केले होते. मात्र, आजही पंतप्रधानांनी या विषयाबद्दल एकही शब्द काढला नाही. तसेच चिक्की घोटाळाप्रकरमी अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेच्या मुद्यावरही ते काहीही बोलले नाहीत.
यावेळी, आंतरराष्ट्रीय योग दिन, पाणी वाचवण्यासाठीचे प्रयत्न आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यावर मोदींनी मते व्यक्त केली. मात्र मोदींच्या या संवादावर काँग्रेसने मात्र टीका केली आहे.  जगभरात नुकताच साजरा केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे अभिनंदन केले. पूर्वी कुणालाच माहित नसलेले आयुष मंत्रालय आंतराराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरात ओळखले जाऊ लागले आहे. योग दिन हा एक दिवसापुरता कार्यक्रम नसून सर्वांनीच तो दररोज आचरणात आणण्याचे आवाहन मोदींनी केले.  तसेच, हरियाणातील एक गाव बीबीपूर येथील सरपंच सुनील यांच्या सेल्फी विथ डॉटर या कल्पनेचे मोदींनी कौतूक केले. ही कल्पना स्वागतार्ह असून हरियाणामध्ये मुलींच्या संख्या वाढवण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे मोदींनी म्हटले. आपल्या मुलींबरोबर सेल्फी काढून ते #SelfieWithDaughter हा हॅशटॅग वापरून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या स्लोगनसहीत ट्विट  करावे. या ट्विटला मी रिट्वीट करेन असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले. पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे पाण्याची बचत करण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे. पावसाच्या पाण्याची साठवण करुन भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर आपण मात करु शकतो, असेही पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी जन सुरक्षा योजनेवर भाष्य करताना राखी पौर्णिमा या सणासाठी एक संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. तर राखीची भेट म्हणून १२ रुपयांची जन सुरक्षा विमा योजना देण्याचे म्हटले आहे.

Story img Loader