पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांना यंदाचा पद्माभूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर करण्यात आला. वन्यजीव अभ्यासक, लेखक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, वने व वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे चैत्राम पवार, प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे पद्माश्री पुरस्काराचे मानकरी ठरले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३९ जणांना पद्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सात जणांना पद्माविभूषण, १९ जणांना पद्माभूषण आणि ११३ जणांना पद्माश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांमध्ये २३ महिला असून १० जण परदेशी नागरिक आहेत. १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

देशाचे माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर, सुझुकी मोटरचे माजी प्रमुख दिवंगत ओसामू सुझुकी, प्रसिद्ध गायिका दिवंगत शारदा सिन्हा यांना पद्माविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्माभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

पद्मा पुरस्काराचे मानकरी

पद्याविभूषण

माजी सरन्यायाधीश न्या. जे. एस. खेहर, सुझुकी मोटरचे माजी प्रमुख ओसामू सुझुकी (मरणोत्तर), कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया, गायिका शारदा सिन्हा (मरणोत्तर)

पद्याभूषण

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), चित्रपट निर्माते शेखर कपूर, ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग, माजी हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, साध्वी साध्वी ऋतंभरा, ज्येष्ठ भाजप नेते सुशील कुमार मोदी (मरणोत्तर), भारतीय-अमेरिकी अभियंता, उद्याोजक विनोद धाम

पद्माश्री

वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली, अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, बँक व्यावसायिक अरुंधती भट्टाचार्य, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार, पारंपरिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर, चित्रकार वासुदेव कामत, गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे १०० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, ब्राझीलमध्ये वेदान्त आणि गीता शिकवणारे अध्यात्मिक गुरू जोनास मासेट्टी, कुवेतमधील योगा प्रशिक्षक शेखा एजे अल सबा, माजी क्रिकेटपटू आर. अश्विन, पॅरालिम्पिक तिरंदाज हरविंदर सिंग, गायिका जसपिंदर नरुला, गायक अरिजीत सिंग.

या सन्मानामुळे माझ्या कार्याला चालना मिळाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असताना शालेय शिक्षणात जंगल, वन्यजीव, पर्यावरण हे विषय असावेत अशी आग्रही भूमिका मी मांडली होती. कारण भविष्यात जंगल, पर्यावरण जपायचे असेल तर विद्यार्थ्यांना आतापासूनच ते शिकवावे लागेल. प्राणिकोश तयार असून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. वृक्षकोश आणि मत्स्यकोशाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.- मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ लेखक.

गेल्या वर्षी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला. या वर्षाची सुरुवात देशातील प्रतिष्ठेचा सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्माश्री पुरस्काराच्या घोषणेने झाली. अजून एक पायरी वर चढलो. मी आजवर जे काम केले, त्याची देशपातळीवरही दखल घेतली गेली, याचा आनंद वाटतो. रसिक प्रेक्षकांच्या सदिच्छा माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या प्रेमाशिवाय हे यश साध्य झाले नसते.- अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar joshi chitampally ashok saraf to be conferred with padma bhushan award mumbai news amy