काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा येत्या सहा महिन्यांत तुरूंगात असतील, असा दावा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केला आहे. आपल्या सरकारच्या काळात काँग्रेसने हरियाणामध्ये केलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
विविध हिंदी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी हरियाणातील जींदमध्ये एका महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभात केलेल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेस आणि रॉबर्ट वद्रांवर टीका केली. ते म्हणाले, हरियाणातील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली ढिंगारा समिती सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. समितीच्या अहवालात ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या सर्वांना तुरुंगात टाकण्यात येईल. ज्या लोकांनी राज्यातील जनतेचा पैसा लुटला आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत माफ केले जाणार नाही. लुटलेला पैसा त्यांच्याकडून वसुल करून तो पुन्हा राज्यातील विकासकामांमध्ये वापरला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हरियाणातील गेल्या सरकारने नोकरभरतीमध्येही घोटाळा करून संपूर्ण प्रक्रियाच कलंकित करून टाकली होती. आम्ही आता नव्या पद्धतीने ५० हजारांपेक्षा जास्त पदे भरण्यास सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader